माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धा; ओसाकाची विजयी सुरुवात

    दिनांक :07-May-2019
नाओमी ओसाका हिने माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत प्रतिस्पर्धी डॉमिनिका चिबुल्कोव्हावर मात करीत लाल मातीच्या कोर्टवर दमदार प्रारंभ केला.
 
 
पोटाच्या दुखापतीमुळे स्टुटगार्ट खुल्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेल्या ओसाकाला महिना अखेरीस होणाऱ्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत खेळता येणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, माद्रिदमध्ये दमदार खेळ करत ओसाकाने आपण पुन्हा लयीत परतत असल्याचा प्रत्यय दिला. ओसाकाने चिबुल्कोव्हावर संघर्षपूर्ण लढतीत ६-२, ७-६ असा विजय मिळवला. आता ओसाकाला पुढील फेरीत स्पेनच्या सारा सॉरीबेस टोरमोशी झुंजावे लागणार आहे.
फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेची विजेती सिमोना हलेप हिने रशियाच्या मार्गारिटा गास्पारयान हिचा ६-०, ६-४ असा प्रभाव केला. कॅरोलिन वॉझ्नियाकीला फ्रान्सच्या अलिझ कॉर्नेटविरुद्धच्या दुखापतीमुळे ०-३ अशा स्थितीतून माघार घ्यावी लागली. कॅरोलिना प्लिस्कोव्हाने युक्रेनच्या डायना यास्तरेमस्का हिचे आव्हान ५-७, ७-६ (७/५), ६-३ असे परतवून लावले.