सीमेवर भारताची ताकद वाढणार; 'भीष्म' रणगाडे दाखल होणार
   दिनांक :07-May-2019
नवी दिल्ली,
भारतीय सैन्य दलात लवकरच ४६४ अतिरिक्त टी-९० 'भीष्म' रणगाडे दाखल होणार आहेत. त्यासाठी भारत सरकारने  रशियासोबत १३,४४८ कोटी रुपयांचा संरक्षण करार केला आहे. हे सर्व रणगाडे २०२२-२०२६ या कालावधीत भारतीय लष्कराला मिळतील. ते सर्व पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर तैनात करण्यात येणार आहेत.
 
 
 
भारतीय लष्करात नव्याने येणारे हे टी-९० भीष्म रणगाडे अद्ययावत असतील आणि त्यांची निर्मिती भारतातच होईल. संरक्षण मंत्रालयातील माहितीनुसार, यासंबंधी रशियाकडून महिनाभरापूर्वीच 'एक्विझिशन लायसेन्स'ला मंजुरी मिळाली आहे. रणगाड्यांच्या निर्मितीसाठीचे 'इंडेंट' (मागणी पत्र) लवकरच ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डांतर्गत चेन्नईतील अवाडी हेवी व्हेइकल फॅक्टरीकडे (एचव्हीएफ) असेल.
या नव्या रणगाड्यांमध्ये रात्रीच्या अंधारातही लढण्याची क्षमता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ४६४ रणगाड्यांच्या 'इंडेंट' प्रक्रियेला विलंब झाला आहे. ती पूर्ण झाल्यानंतर ६४ रणगाडे ३०-४१ महिन्यांत भारतीय लष्कराला मिळणे अपेक्षित आहे.