‘५० कोटी रुपये दिल्यास मोदींची हत्या करण्यास तयार'
   दिनांक :07-May-2019
सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) बडतर्फ जवान तेजबहादूर यादव यांचा दोन वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओत तेजबहादूर यादव हे ‘५० कोटी रुपये दिल्यास मोदींची हत्या करण्यास तयार आहे’, असे बोलताना दिसत आहेत. तर तेजबहादूर यादव यांनी व्हिडिओतील व्यक्ती मीच असल्याचे मान्य केले. पण व्हिडिओशी छेडछाड करण्यात आल्याचा दावा केला आहे.
 
 
 
या व्हिडिओत तेजबहादूर हे एका व्यक्तीशी गप्पा मारताना दिसत आहे. “मला पैसे द्या, मी मोदींची हत्या करण्यास तयार आहे. मला ५० कोटी रुपये द्या”, असे तेजबहादूर यादव बोलताना दिसत आहेत. यावर समोरील व्यक्तीने “मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि फक्त पाकिस्तानसारखे शत्रूराष्ट्रच मोदींच्या हत्येसाठी ५० कोटी रुपयांची सुपारी देतील”, असे सांगितले. यावर तेजबहादूर यांनी सांगितले की, मी देशाशी गद्दारी करणार नाही. मी असे कोणतेही कृत्य करणार नाही. मला एखाद्या भारतीय व्यक्तीने पैसे दिल्यावरच मी हत्या करण्यासाठी तयार आहे.
 
या व्हिडिओवर तेजबहादूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “संबंधित व्हिडिओ हा २०१७ मधील आहे. दिल्ली पोलीस दलातील एका कॉन्स्टेबलने हा व्हिडिओ शूट केला होता. व्हिडिओ शुटिंग केल्याचे मला माहित नव्हते. संबंधित कॉन्स्टेबलने व्हिडिओशी छेडछाड करुन तो व्हायरल केला”, असे तेजबहादूर यांनी म्हटले आहे. मात्र, त्यावेळी नेमकी चर्चा काय झाली होती,याचा तपशील त्यांनी सांगितला नाही. गेल्या आठवड्यात त्या कॉन्स्टेबलने माझ्याशी संपर्क साधला होता. ३० लाख रुपये दिले नाही तर त्याने हे खोटे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती, असा आरोप तेजबहादूर यांनी केला. तेजबहादूर यांच्या दाव्यामुळे हा व्हिडिओ खरा की खोटा, हा संभ्रम कायम आहे.