इंजिनिअर्सना रस्त्यात सापडले ८९ हजार रुपये अन्....
   दिनांक :07-May-2019
घरच्या वाटेवर असताना दोन सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना रस्त्यात ८९,५०० रुपयांची रोकड सापडली. हे पैसे रस्त्यात पडलेले होते. या दोन्ही इंजिनिअर्सनी ही सर्व रक्कम पोलिसांकडे सुपूर्द केली. विजयानगर बस स्थानकाजवळ त्यांना इतकी मोठी रोकड सापडली. मदुराई येथे रहाणारे एन. सेंथील (३२) आणि जी. दिनेश (२९) दोघे तारामनी आणि मानापाक्कम येथील सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला आहेत.
 
दोघे तारामनी येथे अन्य मित्रांसोबत राहतात. सेंथील मित्रांसोबत बंगळुरुला गेला होता. तिथून परतत असताना सेंथीलने कोयामबीडू इथून टॅक्सी पकडली. वेलाचेरी येथे पोहोचल्यानंतर त्याने तारामनीला जाण्यासाठी दिनेशला फोन केला. दोघे घरी परतत असताना त्यांचे रस्त्यात पडलेल्या नोटांच्या बंडलवर लक्ष गेले. त्यांनी ते बंडल उचलले व थेट वेलाचेरी पोलीस स्टेशन गाठले.
सर्व नोटा पाचशे रुपयांच्या होत्या. त्यांनी रात्रपाळीवर असणाऱ्या हेड कॉन्स्टेबलच्या हातात ती सर्व रोकड सोपवली. या दोन युवकांनी जो प्रामाणिकपणा दाखवला त्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. जमा केलेल्या पैशाच्या बंडलमधील सर्व नोटा खऱ्या असून मंगळवारी कोर्टामध्ये ही रक्कम जमा केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. ज्या कोणाचे हे पैसे असतील त्याला कोर्टात कागदपत्रे सादर केल्यानंतर ही रक्कम परत मिळेल.