मायाजाल!
   दिनांक :07-May-2019
शुभ बोल रे... 
 
विनोद देशमुख/9850587622 
 
आंबेडकरनगर! पूर्व उत्तर प्रदेशातील एक जिल्हा आणि लोकसभा मतदारसंघ. पश्चिमेला अयोध्या(फैजाबाद) आणि पूर्वेला आझमगड या दोन जिल्ह्यांच्या मधोमध हा जिल्हा आहे. बसपानेत्या बहेन मायावती प्रथमच मुख्यमंत्री झाल्या, तेव्हाच्या अवघ्या साडेचार महिन्यांंच्या काळात त्यांनी हा नवीन जिल्हा निर्माण केला. आणि आज चोवीस वर्षांनंतर त्या या मतदारसंघावर दावा करीत आहेत. संभाव्य पंतप्रधानपदासाठी लागणारे संभाव्य खासदारपद प्राप्त करण्यासाठी!
हो. मायावतींनी पंतप्रधानपदासाठी स्वत:ची उमेदवारी पुन्हा एकदा जाहीर केली आहे. याआधी त्यांनी फक्त संकेत दिला होता. परवा मात्र स्पष्टपणे इच्छा व्यक्त केली. उद्या मी पंतप्रधान झाली तर लोकसभेत जाण्यासाठी आंबेडकरनगर येथूनच उभी राहीन, असे त्यांनी जाहीर केले आहे. (यावेळी ही जागा बसपाला मिळाली नाही तर कसे, हा भविष्यातील प्रश्न!) भाजपा आणि कॉंग्रेस या दोघांचाही पंतप्रधान यावेळी होणार नाही, असा दावाही त्यांनी केला. या घोषणेचा सरळ अर्थ हा की, यावेळी भाजपाविरोधकांचे खिचडी सरकार आलेच तर कॉंग्रेसचा पंतप्रधान (राहुल गांधी) मायावती खपवून घेणार नाही! विरोधी आघाडीचे शरद पवारसारखे ज्येष्ठ नेते सुद्धा इतरांसोबत मायावतींचेही नाव दावेदारांच्या यादीत मोजत आहेतच. या पार्श्वभूमीवर बहेनजींच्या आत्मविश्वासाला दादच दिली पाहिजे.
 
 
 
मायावती या भारतीय लोकशाहीतील चमत्कार आहे, असे प्रांजळ मत कॉंग्रेसचे पंतप्रधान पी. व्ही. नरिंसह राव यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या कारकीर्दीतच मायावती पहिल्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बनल्या होत्या. त्याही स्वत:चे बहुमत नसताना! मुलायमिंसग यादव यांच्या सपाशी हातमिळवणी करून त्यांनी देशातील सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्रिपद ज्या पद्धतीने मिळविले, ते पाहूनच नरिंसह रावांसारखा चाणक्य वरील अभिप्राय व्यक्त करता झाला. त्यानंतर आणखी तीनदा मायावती मुख्यमंत्री झाल्या आणि त्यातील एकदा पूर्णकाळ त्या पदावर राहिल्या. दुसरे टोक असलेल्या भाजपाशी सुद्धा त्यांनी दोस्ती केली होती. हे राजकीय यश कमी लेखण्यासारखे मुळीच नाही.
यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी सपाशी युती करताना पुन्हा एकदा बहेनजींनी हुशारी दाखविली आहे. सपासोबतची पाव शतकाची दुष्मनी त्यांनी बाजूला ठेवली आणि अखिलेश यादव या नव्या पिढीतील नेत्याशी हात मिळवला. सपा-बसपा युतीत कॉंग्रेस घुसणार नाही, याची पूर्ण काळजी त्यांनी किती दूरदर्शीपणाने घेतली, याचा प्रत्यय परवाच्या त्यांच्या दाव्याने आणून दिला, हे मान्य करावेच लागेल.
दिल्लीच्या सत्तेचा मार्ग आंबेडकरनगरमधून जातो, असे एक विधान मायावतींनी परवा केले, ते कशाच्या भरोशावर, हे कळायला मात्र मार्ग नाही! या भागाचे तसे योगदान असल्याचा इतिहास नाही. उलट, डॉ. राममनोहर लोहिया यांच्यासारखा विरोधी पक्षनेता या भागाने दिला! (लोहियांचा जन्म आंबेडकरनगर जिल्ह्याच्या अकबरपूरचा आहे) ते पाहता मायावतींना दिल्लीच्या सत्तेत जाता येईल की विरोधात बसावे लागेल? 23 मे नंतर पाहू या!