भाजपा प्रचाराची मशाल विवेकच्या हाती
   दिनांक :07-May-2019
युवराजांनी केवळ
लूट केली...
दिल्लीतील सातही जागांवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मतदान करून मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करावे, असे आवाहन चित्रपट अभिनेता विवेक ओबेराय यांनी दिल्लीकरांना केले आहे.
प्रारंभीच उपस्थितांना संबोधित करताना, ओबेराय यांनी विचारले, हाऊ इज द जोश? यावर चोहोबाजूने एकच प्रतिसाद आला.
कॉन्टिट्यूशन क्लब येथे आयोजित ‘सातों सीटे मोदी को’ या अभियानात विवेक ओबेराय हेही सहभागी झाले आणि दिल्लीतील सातही जागी भाजपाच्याच उमेदवारांना निवडून आणण्याचे त्यांनी आवाहन केले. कॉंग्रेसचे नाव न घेता विवेक ओबेराय म्हणाले, जेव्हा जेव्हा देशातील सत्ता युवराजांच्या किंवा विदेशी लोकांच्या हाती आली, तेव्हा तेव्हा त्यांनी केवळ जनतेची आणि देशाची लूटच केली आहे. या शक्तींच्या बचावासाठी आता आपल्याला एकत्र यायचे आहे. देशातील सर्व जनता या मोहिमेत सहभागी झाली पाहिजे. आम्ही सर्व चौकीदार आहोत. आम्ही या देशाची आता लूट होऊ देणार नाही, या निर्धाराने आपण सर्व सज्ज राहिले पाहिजे. मोदींजीके नेतृत्वमे ये देश गिरेगा नही, उठेगा... असे सांगून आपण या कामी सावध राहण्याची गरज आहे, असे ओबेराय म्हणाले.
दिल्ली हे देशाचे हृदयस्थान आहे. माधुरी दीक्षित यांचे हृदय धक-धक करते आणि दिल्लीची स्पंदने काय म्हणतात? मोदी-मोदी! जर हीच देशाच्या हृदयाची धडकन असेल तर मोदीजी नक्की देशाचे पुन्हा पंतप्रधान होतील.
 
 
 
 
यावेळी सर्वांना सातों सीटे मोदी को, असे लिहिलेले टी शर्ट वाटण्यात आले. त्यांनी हे शर्ट आवर्जून घालावेत, असे आवाहन ओबेराय यांनी केले. यावेळी उपस्थित जनतेने भारत माता की जय, वंदे मातरम्‌, नरेंद्र मोदी जिंदाबाद, जय हिंद, घर घर भगवा छायेगा, राम राज्य आयेगा अशा गगनभेदी घोषणा दिल्या. दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघात एकाच दिवशी म्हणजे 12 मे रोजी मतदान होणार आहे.
विवेक ओबेराय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बायोपिक मध्ये मोदींची भूमिका करीत आहेत. पण, यावर विरोधकांनी आक्षेप घेतल्यामुळे आता हा चित्रपट संपूर्ण मतदान संपल्यानंतर 24 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.