बुरहान वाणीच्या गावात शून्य मतदान
   दिनांक :07-May-2019
नवी दिल्ली,
सोमवारी (6 मे) रोजी लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यातील  मतदान पार पडले. या टप्प्यात बंगालमध्ये 74 टक्के, तर अनंतनागमध्ये 3 टक्के मतदान झाले. पुलवामा व शोपिया हा भाग अनंतनाग मतदारसंघात येतो. दहशतवाद्यांनी मतदानावर बहिष्काराचे आवाहन केले होते. त्यामुळे मतदारही घराबाहेर पडायला तयार नव्हते. या मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्रे येतात. मतदारांची संख्या सुमारे सव्वापाच लाख आहे. पण दुपारी दोन वाजेपर्यंत केवळ 1.8 टक्केच मतदान झाले होते. हा देशातील एकमेव मतदारसंघ आहे, जिथे मतदान तीन टप्प्यांत होत आहे. याआधीच्या दोन टप्प्यांतही तिथे जेमतेम 8 ते 9 टक्के मतदान झाले होते.
 
 
तीन वर्षापूर्वी सुरक्षा रक्षकांसोबतच्या चकमकीत मारल्या गेलेल्या हिज्बुल मुजाहिद्दीनचा पोस्टर बॉय बुरहान वाणीच्या गावात शून्य मतदान झाले आहे. बुरहान वाणीच्या गावात एकाही मतदानाची नोंद झालेली नाही. फेब्रुवारीमध्ये पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यातील सूसाइड बॉम्बर आदिल अहमद डार याच्या गावात केवळ 15 लोकांनीच मतदान केले आहे. तसेच दक्षिण काश्मीरमध्ये इतर दहशतवाद्यांच्या गावातही कोणीही मतदान केले नसल्याची माहिती समोर येत आहे.