पाण्यात बुडालेल्या मुलाचा ११ वर्षीय मुलाने वाचविला जीव

    दिनांक :08-May-2019
हिंगणघाट: स्विमिंग टॅंकमध्ये पोहतांना पाण्यात बुडालेल्या मुलाचा दुसऱ्या एका ११ वर्षीय मुलाने दाखविलेल्या प्रसंगावधानमुळे जीव वाचला, जय शैलेशकुमार नाहाटा रा.नयनपूर जिल्हा शिवनी(म.प्र.) हे साहस दाखऊन जीव वाचविणाऱ्या बालकाचे नाव आहे.या बालकाने दाखविलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 
 
 
जय हा उन्हाळ्याच्या सुट्टीकरिता हिंगणघाट येथे त्याची मावशी ज्योती भिकमचंद रांका यांच्याकडे आला आहे.त्याला पोहण्याची आवड असल्याने तो आपला मावस भाऊ अमन सोबत मोहोता जीन मधील स्विमिंग पूल मध्ये पोहायला गेले होते.दरम्यान पोहत असतांना जयला पाण्यात कोणीतरी खाली पाण्यात बुडून असल्याचे आढळून आले, जयने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ६ फुट खोल पाण्यात खोल उडी मारली आणि बुडत असलेल्या मुलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.परंतु त्याला ते शक्य झाले नाही.त्याने पाण्याच्या वरच्या भागात येत स्विमिंग पूलचे प्रशिक्षकाला मदतीसाठी बोलाविले. त्यांनी पाण्यात उडी घेत या बुडालेल्या मुलाला बाहेर काढले.प्रथोमोचार केल्यावर या ९ वर्षीय मुलाला येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचाराकरिता नागपूर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते आता तो धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे.स्वतःचा जीव धोक्यात घालून मदतीला धावणाऱ्या जय शैलेशकुमार नाहाटा याने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे,त्याची सर्वत्र प्रशंसा करण्यात येत आहे.याबाबत या स्विमिंगपूल संचालक श्री. सापधरे यांना विचारले असता त्यांनी घटनेचा दुजोरा दिला आहे.