एका एकरात १३५ क्विंटल हळदीचे उत्पादन

    दिनांक :08-May-2019
 •अभय खेडकर
एका एकरात 135 क्विंटल हळद उत्पन्न घेऊन बांबर्डा कानकिरड येथील शेतकर्‍याने परिसरातील इतर शेतकर्‍यांसमोर एक नवा आदर्श उभा केला आहे. एका एकरात 50 हजार रुपयांच्या खर्चात 3.5 लाखाचे उत्पन्न घेतल्याने एका एकरातील हळद पिकापासून जवळपास 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. 

 
 
प्राप्त माहितीनुसार कांरजा तालुक्यातील बांबर्डा कानकिरड येथील शेतकरी चंद्रकांत विश्वंभर कानकिरड यांच्याकडे जवळपास 16 एकर एवढी शेती आहे. आतापर्यंत ते पारंपरिक पद्धतीने शेती करून पारंपरिक पिके घेत होते. पण शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह हेाईल एवढेही उत्पन्न निघत नसल्याने ते हतबल झाले होते. अखेर आपल्या शेतात सिंचनाची सोय करून पारंपरिक शेतीला बगल देत त्यांनी आपल्या बांबर्डा कानकिरड शेतशिवारातील सर्व्हे नं. 50/2 मधील एकूण क्षेत्रफळापैकी 1 एकर क्षेत्रावर हळदीच्या 20 हजार रूपये किंमतीच्या 10 क्विंटल बेन्यांची 6 जून 2018 रोजी लागवड केली. त्याकरिता त्यांना शेतीमशागत, लागवड, खत, फवारणीसहीत जवळपास 50 हजार रूपये खर्च आला.
 
तुषार सिंचन पद्धतीने या पिकाकरिता सिंचन करून 9 महिन्यानंतर 27 मार्च 2019 पासून काढणीस सुरूवात झाली. हळद लागवड केलेल्या 1 एकर क्षेत्रात हळदीचे 40 क्विंटल गट्टू व 95 क्विंटल कांडी असे 135 क्विंटल उत्पन्न मिळाले. गट्टू 4 हजार रूपये प्रति क्विंटल तर कांडी 2 हजार रूपये प्रति क्विंटल प्रमाणे विक्री केली असून, त्यापासून त्यांना 3 लाख 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यांच्या शेतात मिळालेल्या हळदीच्या विक्रमी उत्पादनाने प्रेरित होऊन गावातील इतरही शेतकर्‍यांचा कल हळद लावगडीकडे वाढत आहे. शिवाय या पिकाला वन्यप्राण्यांपासून धोका होत नसल्याने तसेच रखवालीचा त्रास होत नसल्याने हळद हे पीक दिवसेंदिवस शेतकर्‍यांच्या पसंतीस उतरत आहे. यावरून पारंपरिक पिके सोडून नवनवीन पिके घेतल्यास शेतकायांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते हे सिद्ध होते.