काँग्रेस आता एका रडक्या लहान मुलाच्या भूमिकेत : अरुण जेटली
   दिनांक :08-May-2019
नवी दिल्ली,
देशाच्या राजकारणात एकेकाळी अधिसत्ता गाजवणारा काँग्रेस पक्ष आज एका लहान मुलासारखे वागत असल्याची टीका केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी त्यांच्या ब्लॉग मधून केली आहे. काँग्रेस आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी करून लहान मुलांसारखे वागत आहे. त्यांनी अशा स्वरुपाची वागणूक त्वरीत थांबवावी, असे जेटली म्हणाले.
 
 
या निवडणुकीत काँग्रेस पार्टी एका रडक्या लहान मुलाच्या भूमिकेत आहे. जो एका टोळक्याचे नेतृत्व करत आहे. कलम 19 (1) (ए) प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र स्वरुपात भाषण देण्याचा अधिकार देते. ही कलम संविधानाचा अविभाज्य घटक आहे. त्यास संसद किंवा सुप्रीम कोर्ट सुद्धा कमी करू शकत नाही. निवडणुकीच्या वेळी सुद्धा हा अधिकार कमी नसल्याचे जेटली म्हणाले.
ते पुढे म्हणाले,आचार संहिता उल्लंघनाच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला हवे, की आचारसंहितेचा दाखला देऊन कुणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कमी केले जाऊ शकत नाही.