मोदींमध्ये हिंमत असेल तर त्यांनी २ कोटी रोजगारांच्या आश्वासनावर मते मागावी
   दिनांक :08-May-2019
- हार्दिक पटेल यांचे पंतप्रधानांना आव्हान

 
तभा ऑनलाईन/ भोपाळ,
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला राजीव गांधींच्या नावावर निवडणूक लढवून दाखवा असे आव्हान दिले होते. मोदींच्या या आव्हानाला आता काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी भोपाळमधील एका सभेत प्रतिआव्हान दिले आहे. हिंमत असेल तर २ कोटी रोजगारांच्या आश्वासनांवर मते मागा, असे आव्हान हार्दिक पटेल यांनी मोदींना दिले आहे. 
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींनी दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचा संदर्भ देत हार्दिक पटेल यांनी मोदींना आव्हान दिले आहे. उत्तर प्रदेशातल्या प्रतापगढमध्ये शनिवारी झालेल्या रॅलीत पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना लक्ष्य करताना त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधींवरदेखील टीका केली होती. त्यावेळी त्यांनी राजीव गांधींचा उल्लेख भ्रष्टाचारी नंबर वन असा केला होता. 
 
मोदींच्या टीकेला हार्दिक पटेल यांनी उत्तर देताना मृत व्यक्तीबद्दल वाईट बोलणं आपल्या संस्कृतीत बसत नाही, असे हार्दिक पटेल म्हणाले. 'मोदी उत्तर प्रदेशातल्या सभेत राजीव गांधींना भ्रष्टाचारी नंबर वन म्हणाले. मोदींनी भाषणाच्या आवेशात ते विधान केले असे मला वाटले होते. मात्र त्यानंतरच्या सभांमध्येही मोदींनी त्याची पुनरावृत्ती केली,' असे पटेल म्हणाले. राजीव गांधींविषयी मोदींनी असे विधान करणे दु:खदायक आहे. मोदींकडे त्यांच्या कामाबद्दल बोलण्यास काहीच नसल्याने ते अशी वक्तव्य करत असल्याची टीका त्यांनी केली.