पंतप्रधान मोदींची आज दिल्लीत विजय संकल्प सभा
   दिनांक :08-May-2019
- पाच हजार बसगाड्या आरक्षित
 
 
नवी दिल्ली, 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवडणूक प्रचाराची महासभा आज दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. या सभेत किती गर्दी होणार आणि मोदी काय बोलणार याची भाजपा नेत्यांसह कार्यकर्त्यांना उत्सुकता लागली आहे. मोदींची सभा यशस्वी करण्यासाठी येथील कार्यकर्ते पूर्ण ताकत लावत आहेत.
 
दिल्लीतील नेत्यांच्या मते, ही सभा अविस्मरणीय होणार आहे. या सभेसाठी दोन ते अडीच लाख लोक जमतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
 
दिल्लीतील प्रत्येक भागातून लोक सभेला उपस्थितीत राहतील, यासाठी पाच हजार बसगाड्या आरक्षित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी वृत्तसंस्थेस दिली. सभेसाठी विशेष तयारी कऱण्यात आली असून, रामलीला मैदानाच्या आत आणि बाहेर प्रत्येकी दहा एलईडी पडदे लावण्यात येणार आहेत. या सभेलाही ‘विजय संकल्प सभा’ नाव देण्यात आल्याचे दिल्ली भाजपाचे महामंत्री कुलजितसिंह यांनी सांगितले.