बॉलिवूडचे माझे सगळे मित्र दुरावले: समीरा रेड्डी
   दिनांक :08-May-2019
समीरा लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करत असतानाच समीराने बॉलिवूडच्या आपल्या मित्रांबद्दल एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. २०१२ मध्ये प्रदर्शित ‘तेज’ या चित्रपटात समीरा शेवटची झळकली होती. या चित्रपटात तिच्याशिवाय अजय देवगण, बोमण ईराणी व अनिल कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटानंतर समीरा बॉलिवूडपासून दूर झाली आणि बॉलिवूडच्या मित्रांनाही दुरावली.
 
 
अलीकडे एका मुलाखतीत, समीरा याबद्दल बोलली. ‘बॉलिवूड लाईमलाईटपासून दूर झाले आणि बॉलिवूडचे माझे सगळे मित्र दुरावले. गेल्या अनेक वर्षांत ना कुणी माझी आठवण काढली, ना कुणी माझ्याशी बोलले. प्रत्येक जण मला विसरला. आता बॉलिवूडचा एकही मित्र वा मैत्रिण माझ्या संपर्कात नाही. आता मलाही त्यांच्यासोबत राहण्यात कुठलाही रस राहिलेला नाही. एकेकाळी मला स्वत:बद्दल असुरक्षित वाटू लागले होते. मी प्रचंड घाबरले होते. पण माझ्यासोबत काय झाले, मी बॉलिवूड का सोडले, हे विचारण्याची साधी तसदीही कुणी घेतली नाही. अर्थात मला आता त्याची पर्वा नाही. मी माझ्या संसारात आनंदी आहे,’असे समीरा यावेळी म्हणाली.