मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला

    दिनांक :08-May-2019
 
 
मुंबई:  मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला. भारतीय हवाई दलाचे एएन-32 मालवाहक विमान मंगळवारी रात्री उशिरा उड्डाण करताना धावपट्टीच्या पुढे निघून गेले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. विमान दुर्घटनेनंतर मुंबई विमानतळ काही काळासाठी बंद करण्यात आल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.
विमातळावरील अधिकार्‍यांची या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हवाई दलाचे विमान रात्री 11 वाजून 39 मिनिटांनी धावपट्टी सोडून पुढे निघून गेले. हे विमान कर्नाटकमधील बंगळुरूजवळील हवाई दलाच्या येळाहांका या तळावर जात होते, अशी माहिती त्यांनी दिली.
एएन-32 विमान मुंबई विमानतळाच्या धावपट्टी क्रमांक 27 वरून उड्डाण घेत होते. ही धावपट्टी सध्या सेवेत नाही. घटनेनंतर एएन-32 ची धावपट्टी बंद करण्यात आली आहे. धावपट्टी बंद केल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. विमानतळावर मोठ्या रांगा लागल्या. लोकांनी ट्विट करून याची तक्रारही केली.
या अपघातानंतर अनेक उड्डाणे इतर विमानतळांवर वळवावी लागली. इंडिगो आणि स्पाईस जेटची उड्डाणे क्रमश: अहमदाबाद आणि सूरतला वळविण्यात आली होती.