आयपीएल एलिमिनेटर; सनरायजर्स आणि कॅपिटल्ससाठी आज 'करो या मारो'

    दिनांक :08-May-2019
विशाखापट्टणम,
 
दिल्ली कॅपिटल्सचा संघ आज, बुधवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध एलिमिनेटरमध्ये विजय मिळवित स्वत:ला सिद्ध करण्यास उत्सुक आहे.
आतापर्यंत तळात राहणाऱ्या दिल्ली संघाने यंदा गुणतालिकेत काही काळ अव्वल स्थान भूषविले आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या १२ व्या मोसमाच्या सुरुवातीला संघात बदल करणारा दिल्ली कॅपिटल्स हा संघ यंदाच्या मोसमातील मजबूत संघांपैकी एक ठरला आहे. 
 
 
१४ सामन्यांत ९ विजय व ५ पराभवानंतर १८ गुण मिळविणारा दिल्ली संघ कमनशिबी ठरला. त्यांना ‘करा अथवा मरा’ स्थितीतील एलिमिनेटर लढत खेळावी लागत आहे. हैदराबादच्या तुलनेत तीन सामने अधिक जिंकल्यानंतरही त्यांना त्यांच्याविरुद्ध ही लढत खेळावी लागत आहे. दिल्ली संघाला अद्याप आयपीएलची अंतिम फेरी गाठता आलेली नाही. अव्वल चारमध्ये हा संघ २०१२ नंतर प्रथमच दाखल झाला आहे.
भारताचा सलामीवीर शिखर धवनने आतापर्यंत ४५० धावा केल्या आहेत. युवा पृथ्वी शॉ, कर्णधार श्रेयस अय्यर, विश्वकप संघात स्थान न मिळालेला रिषभ पंत यांनी मोक्याच्या क्षणी शानदार कामगिरी केली आहे.
 आयपीएलच्या इतिहासात १२ गुणांसह प्लेआॅफमध्ये दाखल झालेला हैदराबाद हा पहिला संघ ठरला आहे. गोलंदाजीमध्ये फिरकीपटू रशीद खान, भुवनेश्वर कुमार आणि खलील अहमद यांनी चांगली कामगिरी केली आहे. केन विलियम्सनच्या रूपाने त्यांच्याकडे विश्वासपात्र कर्णधार आहे. गुप्तिलकडून आक्रमक सुरुवातीची अपेक्षा आहे. विजय शंकरकडे विश्वकप स्पर्धेपूर्वी आपली छाप सोडण्याची ही एक संधी आहे.
प्रतिस्पर्धी संघ
दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, शिखर धवन, रिषभ पंत, कोलिन इनग्राम, शेरफेन रुदरफोर्ड, किमो पॉल, अक्षर पटेल, अमित मिश्रा, ईशांत शर्मा, ट्रेंट बोल्ट.
 
सनरायजर्स हैदराबाद : केन विलियम्सन (कर्णधार), रिद्धिमान साहा, मार्टिन गुप्तील, मनीष पांडे, विजय शंकर, युसूफ पठाण, मोहम्मद नबी, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, के. खलील अहमद.
सामन्याची वेळ
रात्री ७.३० पासून