चेन्नईच्या फलंदाजांवर धोनी नाराज

    दिनांक :08-May-2019
घरच्या मैदानावर खेळत असताना चेन्नई सुपरकिंग्ज संघाला मुंबईकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे चेन्नईची अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी वाया गेली. विजयासाठी दिलेलं आव्हान मुंबईने सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पूर्ण केले. पहिल्या सामन्यात पराभव झाला असला तरीही चेन्नईकडे अंतिम फेरीत प्रवेश करण्याची एक संधी कायम आहे. हैदराबाद विरुद्ध दिल्ली यांच्यातील विजेत्याशी चेन्नईला पुन्हा एकदा लढावं लागणार आहे. मात्र मुंबईविरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांनी केलेल्या कामगिरीवर धोनी समाधानी नाही. त्याने आपली नाराजी बोलून दाखवली.
 
 
“कोणालातरी सामन्यात पराभव स्विकारावा लागणार हे सत्य आहे. मात्र काही गोष्टी आमच्या बाजूने गेल्या नाहीत, विशेषकरुन फलंदाजी. घरच्या मैदानावर आम्ही परिस्थितीशी जुळवून घेणं अपेक्षित आहे. या खेळपट्टीवर आम्ही ६-७ सामने खेळलो आहोत, आणि खेळपट्टीचा अंदाज आम्हाला पहिले यायलाच हवा होता. चेंडू बॅटवर सहज येईल की नाही, खेळपट्टीवर चेंडू उसळी घेईल का या सर्व गोष्टींचा अंदाज आधी आम्हाला यायलाच हवा होता. पण तसं झालं नाही, आम्ही फलंदाजी अधिक जबाबदारीने करायला हवी होती. आमच्या संघाकडे सर्वोत्तम फलंदाजांची फौज आहे. मात्र काहीवेळा ते अनाकलनिय फटके खेळतात आणि विकेट गमावून बसतात. या सर्व खेळाडूंवर मोठी जबाबदारी आहे, खडतर प्रसंगात कसा खेळ करावा याचा त्यांना अनुभव आहे. पण मला आशा आहे की पुढच्या सामन्यात आम्ही चांगला खेळ करु.” धोनीने सामना झाल्यानंतर आपली बाजू स्पष्ट केली.