'भारताला संयुक्त राष्ट्रांमध्ये कायमचे सदस्य म्हणून दर्जा मिळावा'
   दिनांक :08-May-2019
भारताबरोबर जर्मन, ब्राझील आणि जपानसारखे देश संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीचे कायमच सदस्य हवेच तसेच सुरक्षा समितीची पुर्नबांधणी करुन या प्रमुख देशांचा समावेश करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रांनी घ्यायला हवा असं मत फ्रान्सने संयुक्त राष्ट्रांच्या समितीसमोर व्यक्त केले आहे. तसेच भारताबरोबरच इतर महत्वाच्या देशांना कायमचे सदस्य म्हणून दर्जा मिळवून देण्याच्या विषयाला आमचे प्राधान्य असल्याचे फ्रान्सने स्पष्ट केले आहे.
 
 
भारत हा मागील बऱ्याच काळापासून संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीमध्ये कायमचे सदस्यत्व मिळावे म्हणून प्रयत्न करत आहे. सध्याची परिस्थिती पाहता भारतासारख्या देशांना सुरक्षा समितीमध्ये कायमचे स्थान मिळायलाच हवे असा पाठपुरावा फ्रान्सने केला आहे. ‘फ्रान्स आणि जर्मनी दोन्ही देशांची धोरणे ही एकत्र काम करण्याबद्दल सकारात्मक आहेत. या धोरणांनुसार सुरक्षा समितीला अधिक मजबूत करणे काळाची गरज असून यामाध्यमातून या समितीला अधिक सक्षम करण्यासाठी नवीन सदस्यांना स्थान द्यायला हवे. आम्ही नवीन देशांना कायम सदस्यत्व देण्याच्या बाजूने असून याबद्दल कोणतेही दुमत नाही’ असं मत फ्रान्सचे संयुक्त राष्ट्रातील अधिकारी फ्रॅन्स्को डेलाट्रे यांनी फ्रान्सची बाजू मांडताना व्यक्त केले. फ्रान्स हा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीमधील कायमचे सदस्यत्व असणारा देश असल्याने या भूमिकेला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.