पुढील पाच वर्षांमध्ये त्यांना तुरुंगात टाकू; मोदी यांचा रॉबर्ट वढेराला इशारा
   दिनांक :08-May-2019
जनतेच्या आशीर्वादाने हा चौकीदार शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांना तुरुंगाच्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन गेला आहे. आता त्यांना जामिनासाठी कोर्टाचे आणि अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) चक्कर मरावे लागत आहे.  त्यांना कारागृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत नेले असून पुढील पाच वर्षांमध्ये त्यांना तुरुंगात टाकू, असा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॉबर्ट वढेरा यांना दिला आहे.
 

 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरयाणामधील फतेहाबाद येथे बुधवारी सभा घेतली. मोदी म्हणाले, पाच टप्प्यांमधील मतदान झाले असून आता चित्र स्पष्ट झाले आहे. केंद्रात भाजपाचीच सत्ता येणार. काँग्रेस देशाच्या सुरक्षेबाबत काहीच बोलू शकत नाही. २०१४ पूर्वी पाकिस्तान दररोज सीमेवर कुरापती करत होता. देशाच्या विविध भागांमध्ये दहशतवादी हल्ले व्हायचे. पण सरकार काहीच करत नव्हते. तुम्ही देशाच्या सुरक्षेला भक्कम केल्याशिवाय जागतिक महासत्ता होऊ शकत नाही. काँग्रेस आणि त्यांच्या ‘महामिलावटी’ साथीदारांनी देशाच्या सुरक्षेबाबत भाष्य केले आहे का?, जो स्वत:च्या देशाचे रक्षण करु शकत नाही, तो दुसऱ्यांचे काय रक्षण करणार, असा सवालही मोदींनी विचारला.
 
 
आता आमचे सैन्याचे जवान दहशतवाद्यांच्या तळांवर घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करतात. भाजपाच्या काळात आधी सर्जिकल स्ट्राइक झाले आणि मग बालाकोट येथे एअर स्ट्राइक करण्यात आले, असे मोदींनी सांगितले. पाकिस्तानला आता मसूद अझरवर कारवाई करण्यासाठी भाग पाडले असून सत्तेत असताना काँग्रेस सरकार अशी कारवाई का करु शकली नाही, असा सवालही त्यांनी विचारला.भारत माता की जय, अशा घोषणा देण्यावर आक्षेप घेणाऱ्या काँग्रेसने आता देशद्रोहचे कलम रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. भारताला शिवीगाळ करणाऱ्या, तिरंग्याचा अपमान करणाऱ्या आणि नक्षलवाद्यांच्या समर्थकांना दिलासा मिळावा, हेच काँग्रेसला हवं असल्याचे मोदींनी सांगितले.