लिंबा राम यांना क्रीडा मंत्रालयाकडून मदत

    दिनांक :08-May-2019
आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकलेले भारतीय तिरंदाजीतील पहिले विश्वविक्रमी नाव म्हणून ज्या लिंबा राम यांचे नाव घेतले जाते, त्यांना आजारपणात केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी लिंबा राम यांच्यावरील उपचारांसाठी पाच लाख रुपयांच्या अतिरिक्त आरोग्य विम्याची सुविधा उपलब्ध करून दिली.
 
१९९२च्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक हुकलेल्या लिंबा राम यांना मेंदूशी संबंधित आजाराने ग्रासले आहे. त्यांना दिल्लीतील एम्सच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु दिवसागणिक आजारात वाढ होत असून हा आजार पार्किन्सनकडे सरकरण्याची भीती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना वाटत आहे. त्यामुळे त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया करावी लागू शकते.
‘‘हा आजार पूर्णपणे बरा होणारा नसला तरी किमान नियंत्रणात राहू शकतो. त्यामुळे त्यांना अधिकाधिक चांगल्या उपचारांची गरज आहे. त्यामुळेच आम्हाला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे,’’ अशा शब्दात लिंबा राम यांच्या पत्नी मेरिअन जेन्नी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.