अज्ञात वाहनाच्या धडकेत मॉर्निंग वॉकला गेलेल्या दाम्पत्याचा मृत्यू
   दिनांक :08-May-2019
 
 
लातूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत मॉर्निंग वॉकला गेलेल्या लातूरमधील शिक्षक दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शिरुरताजबंद-हाडोळती मार्गावर बुधवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास सोमवंशी दाम्पत्य मॉर्निंग वॉक करत असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जबरदस्त धडक दिली होती.
 
 
 
श्रावण रामराव सोमवंशी आणि त्यांची पत्नी प्रतिभाताई सोमवंशी हे दोघे नेहमीप्रमाणे सकाळी फिरण्यास घराबाहेर पडले होते. शिरुरताजबंदपासून दीड किमी अंतरावर गेले असता त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली.
अपघातात प्रतिभाताई यांचा जागीच मृत्यू झाला होता तर श्रावण सोमवंशी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी अहमदपूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी असल्याने त्यांना लातूर येथील जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्यांचाही मृत्यू झाला. शिरुरताजबंद येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. श्रावण सोमवंशी हे मूळचे अहमदपूर तालुक्यातील वाढवण्याचे असून दोघेही वळसंगी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक होते. निरोगी आरोग्यासाठी सकाळी फिरायला जाणे अखेरचे ठरल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.