वास्तुदोष असल्यामुळे बँकेला होतोय तोटा ; संचालक मंडळाचा जावई शोध
   दिनांक :08-May-2019
नाशिक :  नाशिक जिल्हा बँकेच्या नव्या इमारतीची जागा  कधीकाळी कब्रस्तानची असल्यामुळे याठिकाणी भुताटकी असल्याने बँकेची आर्थिक स्थिती खालावत असल्याचा जावई शोध बँकेच्या संचालक मंडळाने लावला आहे. 
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जुन्या सीबीएस जवळील इमारतीत पुन्हा बँक सुरू करण्याचा तगादा कर्मचाऱ्यांनी लावला होता. त्यामुळे नाचता येईना अंगण वाकडे अशी काहीशी परिस्थिती नाशिक जिल्हा बँकेची झाली आहे. यापूर्वीही मांत्रिकाला बोलावून असे प्रकार करण्यात आले होते अशी माहिती पुढे आली आहे. याचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने निषेध केला आहे.
गेल्या दहा वर्षांपूर्वी जिल्हा बँकेचे नवीन इमारतीत स्थलांतर झाले होते. जिल्हा बँकेचे एकूण 2700 कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. निफाड सहकारी साखर कारखान्यावर 140 कोटींची थकबाकी आहे. पीककर्ज आणि शेतीशी संबंधित बँकेचे 1 लाख 17 हजार थकबाकीदार आहेत. त्यात 6500 बडे थकबाकीदार आहेत. 650 थकबाकीदारांची लिलावासाठी मालमत्ता जोडणी सुरू आहे.