‘चौकीदार चोर है’ प्रकरण; राहुल गांधींकडून सुप्रीम कोर्टाची बिनशर्त माफी
   दिनांक :08-May-2019
नवी दिल्ली,
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आहे. चौकीदार चोर है प्रकरणात राहुल गांधींनी तिसऱ्यांदा प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. याआधीच्या दोन प्रतिज्ञापत्रात त्यांनी खेद व्यक्त केला होता. मात्र आता त्यांनी बिनशर्त माफी मागितली आहे. यावर न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
 
 
 
निवडणूक प्रचारादरम्यान, काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना चौकीदार चोर है अशी घोषणा दिली होती. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने राफेलप्रकरणी यापूर्वी केंद्र सरकारला फटकारले होते. मात्र, कोर्टाच्या या निकालाचा दाखला देताना राहुल गांधी यांनी कोर्टानेही चौकीदार चोर असल्याचे मान्य केल्याचे म्हटले होते. 
 
 
राहुल गांधींनी शपथपत्रात त्यांची चूक कबूल केली. आपण चुकीच्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या नावाने  भाष्य केल्याचे  राहुल यांनी शपथपत्रात म्हटले. राहुल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले शपथपत्र तीन पानांचे आहे. याआधीच्या दोन शपथपत्रांमध्ये खेद करणाऱ्या राहुल यांनी तिसऱ्या शपथपत्रात न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली आहे. आपण न्यायालायाची माफी मागत असून पंतप्रधान मोदी किंवा भाजपाची माफी मागत नसल्याचे राहुल यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलं होतं.