शकुंतला देवींच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री
   दिनांक :08-May-2019
अभिनेत्री विद्या बालन लवकरच एक नवीन व्यक्तिरेखा साकारत आहे. ‘सुलू’ असो किंवा मग ‘बेगमजान’ प्रत्येक भूमिकेला तितक्याच प्रभावीपणे रुपेरी पडद्यावर उतरवणारी विद्या नेहमीच तिच्या अभिनयाच्या माध्यमातून अनेकांना आश्चर्यचकित करत गेली. ती आता प्रसिद्ध गणितज्ञ शकुंतला देवींच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.
 

अनु मेनन हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. विक्रम मल्होत्रांची निर्मिती असलेला हा बायोपिक २०२० च्या उन्हाळ्यात रिलीज होणार असल्याचं म्हटल जात आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श आणि खुद्द विद्या बालनच्या ट्विटवरून विद्या बालन शकुंतला देवींची प्रमुख भूमिका साकारत असल्याच स्पष्ट झाल आहे.
 
शकुंतला देवींचा जन्म १९२९ मध्ये बंगळूरू मध्ये झाला. लहानपणीच त्यांच्या वडिलांना त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची प्रचिती आली. त्यांनी गणिताबरोबर ज्योतिषशास्त्रावर सुद्धा अनेक पुस्तकं लिहिली आहेत. १९८२ साली गिनीज बुक ऑफ रेकॅार्डने त्यांच्या कामाची दखल घेतली.
“शकुंतला देवींसारख्या असामान्य व्यक्तिमत्वाच्या भूमिकेला विद्या बालनसारखी अष्टपैलू अभिनेत्रीच योग्य न्याय देऊ शकते.” असं निर्मात्यांच म्हणणं आहे.
 
 
 
“गणितज्ञ शकुंतला देवींची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारण्यास मी अतिशय उत्सुक आहे. मी आणि विक्रमने याआधी ‘कहानी’साठी एकत्र काम केलं आहे. शकुंतला देवींचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. छोट्याशा गावातून आलेल्या ह्या महिलेची गोष्ट चित्रपटातून दाखवणं आनंदाची बाब आहे.”असं विद्या बालनने सांगितलं.