बनावट अधिकाऱ्याची महिलेकडून 'बेदम धुलाई'!, व्हिडीओ व्हायरल
   दिनांक :08-May-2019
जमशेदपूर,
झारखंडमधील जमशेदपूर येथे महिलेकडे पैशांची मागणी करणे एका भामट्याला चांगलेच महागात पडले. स्‍वत:ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा (एसीबी) अधिकारी म्‍हणवून घेणाऱ्या भामट्याची महिलेने चप्पलने धुलाई केली. या भामट्याच्या धुलाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
 
 
 
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अधिकारी असल्‍याचे सांगून संशयित आरोपीने एका महिलेकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली. या महिलेने लाचेची रक्‍कम देण्यासाठी त्‍याला ठरलेल्‍या ठिकाणी बोलविले. याचदरम्‍यान तिने पोलिसांनाही याबाबत माहिती दिली. ठरलेल्‍या ठिकाणी संशयित आरोपी पैसे घेण्यासाठी आल्‍यानंतर त्‍या महिलेने पैशाऐवजी त्‍याला चप्पलने बेदम झोडपले. घटनास्‍थळी उपस्‍थित असलेल्‍यांनी या घटनेचा व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल केला.
 
 
संशयित आरोपीला एका व्यक्‍तीने उचलून रस्‍त्‍यावर आदळल्‍याचे व्हायरल झालेल्‍या व्हिडिओत दिसत आहे. याचवेळी संबंधित महिलेने त्‍याची कॉलर पकडून चप्पलने बेदम धुलाई केली. घटनास्‍थळी उपस्‍थित असलेल्‍या पोलिसांनी संशयिताला महिलेच्या ताब्‍यातून सोडवून आपल्‍या गाडीत बसविले.
जमशेदपूरमधील मैंगो पोलिस ठाण्याचे प्रभारी अरुण मेहता यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, संबंधीत महिलेने तक्राद केली होती की, संशयीत आरोपीने तक्रारदार महिलेच्या घरातील एक प्रकरण मिटविण्यासाठी तिच्याकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली. त्‍याने स्‍वत: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अधिकारी असल्‍याची आपली ओळख सांगितली होती. त्‍याच्याजवळ बनावट ओळखपत्रही मिळाले असून पोलिस या घटनेची चौकशी करत आहेत.