मी घड्याळाचे बटन दाबले तर कमळाला मत गेले : शरद पवार

    दिनांक :09-May-2019
तभा ऑनलाईन  
सातारा,
देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

 
 
मी ईव्हीएम मशिनचा स्वत: अनुभव घेतला आहे. मला ईव्हीएम मशीनची चिंता वाटते. कारण माझ्यासमोर हैदराबाद आणि गुजरातमधील काही लोकांनी मशीन ठेवली आणि मला बटन दाबायला सांगितले. मी घड्याळाचे बटन दाबले तर कमळाला मत गेल्याचे मी स्वतः डोळ्याने पाहिले आहे. असे पवार म्हणाले. साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आले असतावेळी ते बोलत होते.
 
सगळ्याच मशीनमध्ये असे असेल असे मी म्हणत नाही मात्र मी हे पाहिले म्हणून मी काळजी व्यक्त केली असे पवार म्हणाले. यासाठी आम्ही न्यायालयात गेलो, मात्र दुर्दैवाने तेथे आमचे म्हणणे ऐकले नाही. आम्ही 50 व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्या मोजण्याची मागणी केली होती. यापूर्वीच्या मतदानात सगळ्या चिठ्ठ्या मोजल्या जायच्या. त्या चिठ्ठ्या आताच्या चिठ्ठ्यांपेक्षा मोठ्या देखील होत्या, असेही पवार यांनी सांगितले.