तेजबहादूर यादव यांना 'सर्वोच्च' झटका; याचिका फेटाळली
   दिनांक :09-May-2019
नवी दिल्ली,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी येथून उमेदवारी अर्ज दाखल करणारे बीएसएफचे बडतर्फ जवान तेजबहादुर यादव यांच्या बाद उमेदवारी अर्जाबाबत दाखल करण्यात आलेली याचिका आज गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. तेजबहादुर यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने बाद केला आहे. याविरोधात तेज बहादूर यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. जनहित याचिकेच्या आधाराने यामध्ये हस्तक्षेप करण्याचा आम्हाला अधिकार नसल्याचेही न्यायालयाने यावेळी नमूद केले.
 
 

तेजबहादूर यादव यांनी वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात समाजवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, त्यांचा अर्ज बाद झाल्यानंतर निवडणूक आयोगावर आरोप करीत त्यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपल्या याचिकेत त्यांनी आरोप केला होता की, सत्ताधारी पक्षाचे उमेदवार असलेल्या मोदींना सहज विजय मिळवता यावा यासाठी आपला अर्ज बाद करण्यात आला आहे.

 
 
 

याप्रकरणी वाराणसीचे निवडणूक अधिकारी राजेश कुमार म्हणाले, निवडणूक लढवताना यादव यांनी निवडणूक आयोगाची परवानगी घेतली नव्हती. जे सरकारी कर्मचारी आहेत तसेच अशा कर्मचाऱ्यांना जर सेवेतून काढून किंवा बडतर्फ करण्यात आले असेल तर तशी माहिती आयोगाला देणे आवश्यक आहे.

 

यादव हे बीएसएफमध्ये कार्यरत होते. सेवेत असताना सैन्यात जवानांना देण्यात येणाऱ्या निकृष्ट जेवणाबाबत त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यांचा हा तक्रार करणारा व्हिडिओ २०१७मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांना बीएसएफमधून बडतर्फ करण्यात आले होते.