तीव्र उन्ह आणि नागपूरकर!
   दिनांक :09-May-2019
 खास बात 
सर्वेश फडणवीस
8668541181
 
पुण्या-मुंबईच्या लोकांसमोर नागपूरचे नाव काढले तर सर्वप्रथम ते नाक मुरडतात, कारण नागपूरचा उन्हाळा! बापरे! इतक्या गर्मीत कसे राहतात हे लोकं ? असाच विचार ते करतात. पण नागपूरकर मात्र हा उन्हाळा चांगलाच ‘एन्जॉय’ करतात. पुणेकरांच्या भाषेत सांगायचे तर नागपूर हे अजूनही तसे म्हंटले तर स्वतंत्र घराचे शहर आहे. संध्याकाळी अंगणात किंवा गच्चीवर पाईपने पाणी शिंपडायचे मग घराच्या अंगणात किंवा गच्चीवर खाट किंवा खुर्च्या ठेवून निवांत कुटुंबातील सदस्य किंवा मित्र एकत्र येऊन गप्पा याचा अनुभव फक्त नागपुरात घेऊ शकतो.
 
उन्हाळ्याच्या सुटीत भाऊ-बहिणी राहायला आले, की मग दुपारी गाण्यांच्या भेंड्या, पत्ते, व्यापार, कॅरम, शेजार्‍यांकडे जाऊन एकत्र व्हिडीओ गेम आणि नाश्त्याला कच्चा चिवडा आणि सोबतीला सरबत किंवा पन्हे. चेंज म्हणून मग रसना, पेप्सी जी आजही सगळीकडे मिळते. दुपारी विकतचा बर्फ गोळा खाणे आणि गावरानी आंब्याच्या रसावर ताव मारणे, हे अस्सल नागपूरकर अजूनही करतो. 
 
 
बैगनफल्ली आंबेे आणि अस्सल नागपूरकर हे समीकरणच आहे. हा बैगनफल्ली आंबा खाल्ल्याशिवाय उन्हाळा खर्‍या अर्थी साजरा करतच नाही. मुंबई-पुण्याकडील लोक हापूसचे जे गोड कौतुक करतात ते आम्ही नागपूरकर त्याचाही तसाच आस्वाद घेतो. पण आमचा बैगनफल्ली बेस्टच! रात्री कुटुंबातील सदस्य किंवा मित्र मैत्रिणी चक्कर मारायला जाताना रस्त्यात भेळ, पाणीपुरी मग आईसक्रीम, लस्सी आणि मुख्य म्हणजे उसाचा रस यावर ताव मारतात. हे फक्त खर्‍या अर्थाने अस्सल नागपूरकरच करू शकतो. आता फ्लॅट संस्कृती आली, पण उन्हाळ्याची गंमत काही कमी झाली नाही. फक्त स्वरूप बदलले. उन्हाळ्याची चाहूल लागली की अडगळीतला कुलर काढून त्याला पेंट करणे, नव्याने खस/ वुड-वुल टाकून वायरिंग चेक करणे हा नागपूरकरांचा छंद आहे.
 
बाल्कनीतून दूरवर नजर टाकली तर कॉंक्रिटच्या जंगलातही हिरवीगार झाडी दिसतात. कुठे ही नागपुरात फेरफटका मारायला गेलो तरी हिरवेगार नागपूर अजूनही मनाला आनंद आणि उत्साह देऊन जातो. आता काळ बदलला अशी ओरड असताना मुलांसाठी हॉबी क्लासेस, ज्युडो-कराटे, स्विमिंग,स्केटिंग हे ही आहेच. कंटाळा आला तर सिनेमॅक्स, पीव्हीआर आहेत. शिवाय बर्गर, पिझ्झा यांची होम डिलिव्हरी आहे. पण पूर्वीसारखे महिना महिना जिवाचे नागपूर करायला आता कुणा जीवलग नातेवाईकाला वेळ नाही. घरात किचनपर्यंत हक्काने डोकावून विचारपूस करणारे शेजारी नाहीत.
 
भेंड्या, व्यापार मागे पडले. पत्त्यांचाच पत्ता नाही. अशी सगळीकडे चर्चा असताना उन्हाळ्यातली ती गंमतच गेली, असे सगळेजण म्हणत असताना आजही नागपूरात हे बर्‍याच अंशी अनुभवायला मिळते. अस्सल नागपूरकर येणारा उन्हाळा त्याच जोमाने दरवर्षी एन्जॉय करत असतो. हे सगळं करताना त्याला वयाचे बंधन नसतेच. काही काळ त्याला आपण तरुण असल्याचाच भास होतो आणि नकळतपणे तो आनंदाने ते करत असतो. सर्वत्र तीव्र उन्ह आहे. छोट्या छोट्या गोष्टींतून मिळणारा आनंद हा पैशापेक्षा काकणभर जास्तच आहे आणि यावरून वाटचाल करताना सकारात्मक विचारांची सोबत करताना हा आनंद अधिक उत्साह प्रदान करत असतो.
 
चला तर हा उन्हाळा त्याच उत्साहात साजरा करूया.. 
आणि आपल्या आवडत्या तरुण भारत च्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका...