अमरावती जिल्ह्यात पाण्याची चणचण

    दिनांक :09-May-2019
फक्त १८ टक्केच पाणीसाठा शिल्लक 

 
 
अमरावती, 
जिल्ह्यातील मोठे, मध्यम, लघु प्रकल्पांमध्ये शिल्लक असलेल्या पाण्याचा साप्ताहीक आढावा आज गुरूवार ९ मे रोजी घेण्यात आला. या प्रकल्पांमध्ये एकूण १८.७३ टक्के म्हणजेच १७३.४४ द.ल.घ.मी. जलसाठा आता राहिला आहे.
 
जिल्ह्यात अप्पर वर्धा हा मोठा तर शहानूर, चंद्रभागा, पूर्णा व सपन हे चार मध्यम व ८० लघु असे एकूण ८५ प्रकल्प आहे. या प्रकल्पांमध्ये गुरूवार ९ मे पर्यंत १७३.४४ द.ल.घ.मी पाणी शिल्लक राहिले आहे. त्याची टक्केवारी १८.७३ आहे. मागील आडवड्यात १७८.६७ द.ल.घ.मी. पाणीसाठा प्रकल्पांमध्ये होता. सात दिवसात तो जवळपास 5 टक्क्याने कमी झाला आहे. जलसाठा प्रत्येक आठवड्यात ५ टक्क्याने कमी होत आहे. विशेष म्हणजे मागच्या वर्षी याच तारखेला प्रकल्पांमध्ये ३०६.१२ द.ल.घ.मी. पाणीसाठा शिल्लक होता. त्याची टक्केवारी ३३.०७ होती. २०१४ ते २०१७ या चार वर्षात प्रकल्पांचा जलसाठा चांगला होता. गेल्या अनेक वर्षात यंदा पहिल्यांदा जिल्ह्यातल्या प्रकल्पांचा जलसाठा गतीने कमी होत आहे. गेल्या वर्षी झालेले कमी पर्ज्यन्यमान हे त्या पाठीमागचे प्रमुख कारण आहे.
 
गुरूवार ९ मे पर्यंत अप्पर वर्धा धरणात ९७.२६ द.ल.घ.मी. पाणी शिल्लक असून त्यांची टक्केवारी १७.२३ आहे. मध्यम प्रकल्प असलेल्या शहानूर धरणात १७ द.ल.घ.मी., चंद्रभागा प्रकल्पात १४.७० द.ल.घ.मी., पूर्णा धरणात ९.६० द.ल.घ.मी., सपन प्रकल्पात १७.८९ द.ल.घ.मी. पाणीसाठा शिल्लक आहे. 80 लघु प्रकल्पांमध्ये सरासरी १७.०९ द.ल.घ.मी. पाणी शिल्लक आहे. तापमानातली तीव्रता कायम राहील्यास पाणीसाठा आणखी वेगाने कमी होणार आहे. सध्या अमरावती शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातल्या ज्या भागात प्रकल्पावरून पाणी पुरवठा सुरू आहे, तेथे सुद्धा दोन-तीन दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात १९ गावांमध्ये २१ पेक्षा जास्त गावांमध्ये टँकरने पुरवठा सुरू आहे. अनेक गावातील नागरिकांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रशासनाला उपयोजनांचा वेग वाढवावा लागणार आहे.