पण, मग गांधारी कोण?
   दिनांक :09-May-2019
 
निवडणुकीच्या काळात एकमेकांवर थोडेबहुत आरोप-प्रत्यारोप करण्याची राजकारण्यांची, लोकशाही व्यवस्थेतली तर्‍हा भारतीय नागरिकांच्या एव्हाना अंगवळणी पडली आहे. नाही म्हणायला थोडाबहुत प्रभावही पडतोच, या काळातील घटनाक्रम, आरोप-प्रत्यारोपांचा. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्यांना कधीनव्हे एवढा हुरूप येतो, विरोधकांवर तुटून पडण्यासाठी. एकमेकांविरुद्ध बरळण्याचीही जणू शर्यत लागते, या कालावधीत. बरं, निवडणुकीच्या या रणधुमाळीत दुसर्‍यांवर निशाणा साधताना त्याला तीक्ष्ण बाणांनी घायाळ करण्याचाच इरादा फक्त राहात असावा कदाचित प्रत्येकाचा. म्हणूनच की काय, पण आरोपांच्या फैरी झाडताना कशाचेही तारतम्य बाळगण्याची गरज वाटत नाही इथे कुणालाच. आपले बोलणे कुणीच सत्याच्या कसोटीवर तपासून बघत नाही, याची पुरेपूर खात्री असल्याने वाट्‌टेेल तसे बेताल बरळणे सुरू असते. खरंतर, जनतेचा आपल्यावर पूर्ण विश्वास असल्याच्या अतिआत्मविश्वासातून ती बडबड सुरू झालेली असते. जनतेसाठीच्या प्रेमाचे भरतेही राजकारण्यांना याच एका कालावधीत येते अन्‌ त्यांच्यासाठी प्राणपणाने लढण्यासाठीही हाच एक काळ असतो, नेत्यांनी पेटून उठण्याचा. स्वत:चा इतिहास मागे टाकून इतरांच्या वर्तमानाचे खोबरे करायला धजावणेही फार सोपे ठरते मग. आता कॉंग्रेस नावाच्या, शतकाची परंपरा लाभलेल्या एका राजकीय पक्षाचीच परिस्थिती बघा ना! जो पक्ष बोफोर्सच्या संदर्भात कधी बोलण्यास धजावला नव्हता, तो आता राफेलच्या प्रकरणात जणू चवताळून उठला आहे. ज्यांनी कधीकाळी आणिबाणीच्या माध्यमातून देशावर हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न केला, त्यांचेच चेलेचपाटे आता मोदींवर हुकूमशाही गाजवण्याचा आरोप करताहेत. ज्या पक्षातील भ्रष्टाचार्‍यांची लांबलचक यादी संपता संपत नाही ते, स्वच्छ कारभाराच्या अपेक्षा यंदाच्या सरकारने पूर्ण केल्या नसल्याचा दावा करताहेत. ज्यांच्या सत्ताकाळात या देशातली कोट्यवधींची संपत्ती स्वीस बँकेत जमा झाली, त्यांना त्याची जराशीही लाज वाटत नाही. पण, मोदींना ती संपत्ती परत आणण्यात पुरते अपयश आले असल्याचा कांगावा मात्र ती मंडळी मोठ्याने ओरडून करते आहे. या वावटळीत राजकारणाचा गंध नसलेल्या प्रियांका वढेरा यांनी तर नरेंद्र मोदींना थेट कौरवांच्या रांगेत नेऊन बसवले आहे...
 
 
 
 
गांधी घराण्यातील लोकांना हा देश म्हणजे त्यांच्या बापजाद्यांची संपत्ती वाटतो. त्यावरील निरंकुश सत्ता हा केवळ आपला अधिकार असल्याच्या थाटातली त्यांची वागणूक असते. दुर्दैवाने, त्यांचा तो विचार योग्य ठरवण्याची परिस्थिती निर्माण होण्यास इथली जनताही तेवढीच कारणीभूत ठरली आहे. परिणामी, कॉंग्रेसजनांच्या मनातील तो समज दिवसागणिक दृढ होत गेला. या घराण्यातला जन्म वा त्याच्याशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आलेला संबंध, एवढी बाबही हा समज दृढ होण्यास पुरेसा ठरू लागला. म्हणूनच राजीव गांधी या देशाचे पंतप्रधान होऊ शकले. म्हणूनच कधीकाळी सोनियाही त्या पदाच्या शर्यतीत उतरल्या आणि आता राहुल, प्रियांकाही तोच समज उराशी बाळगून चार पावलं सरसावले आहेत. आपल्या शिवायही कुणी या देशाची सत्ता सांभाळू शकतो, आपल्याशिवाय कुणी इथे सत्तेत येऊ शकतो, हे वास्तव पचविणेही जिकिरीचे झाल्यानेच जीव कासावीस होऊ लागलाय्‌ या मंडळींचा. अहो, यांना तर पी. व्ही. नरिंसह राव, डॉ. मनमोहनिंसग या कॉंग्रेसनेत्यांनी पंतप्रधान झालेलेही चालले नाही. त्यांना ज्या तर्‍हेची वागणूक सोनिया अन्‌ राहुल यांनी यापूर्वी दिलीय्‌, ती विस्मरणात गेलेली नाही अद्याप कुणाच्याच. कुठून आली ही मुजोरी? सत्ता फक्त गांधी घराण्याभोवतीच फिरत राहिली पाहिजे, हा अट्‌टहास कुठून निर्माण झाला? स्वत:शिवाय कुणालाही स्वस्थपणे कारभार करू न देण्याची गुर्मी कुठून आली? कॉंग्रेस पक्ष सत्तेवर आला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांची चाललेली धडपड एकवेळ समजण्यासारखी आहे. तो त्या कार्यकर्त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे. पण, फक्त आणि फक्त ‘गांधी’ घराणे सत्तेवर यावे यासाठी आटापिटा नेमका कुणाचा चाललाय्‌? कुठल्या अहंकारातून साकारली गेली आहे ही भूमिका?
मोदी म्हणे दुर्योधन? अन्‌ कॉंग्रेस पक्षाचे स्वनामधन्य नेते? ते कोण आहेत? कशाचा कशाशी काहीएक संबंध नसताना इंदिरानंतर राजीव यांना पंतप्रधान बनवायला, ती काय राजघराण्याची परंपरा होती? मग का म्हणून बनवले अन्‌ स्वीकारले गेले त्यांना पंतप्रधान म्हणून? कुणाच्या स्वार्थासाठी लादली गेली या देशावर आणिबाणी? तो काय कॉंग्रेस पक्षाच्या हितासाठी घेतलेला निर्णय होता? डॉ. मनमोहनिंसगांना पंतप्रधान केले होते, तर मग सोनियांसाठी युपीएच्या अध्यक्ष म्हणून अजून वरचा दर्जा का निर्माण करण्यात आला? सत्ता आपल्याच पक्षाच्या ताब्यात असताना, त्यावर समाधान न मानता, वर िंसहासनावरही फक्त आपणच असलो पाहिजे, ही मगरुरी दुर्योधनाच्या वर्तणुकीशी साधर्म्य साधणारी नाही? गांधी घराण्यातल्या जन्माचा एक मुद्दा सोडला, तर इतर कोणत्या निकषांवर राहुल यांच्या पदरी पडले कॉंग्रेसचे अध्यक्षपद? असे सातत्याने मुजोरपणे वागणार्‍यांनी इतरांना कशाला द्यावी दुर्योधनाची उपमा? आणि दुर्योधन केवळ अहंकारासाठीच कुठे ओळखला जात होता? अहंकाराच्या पलीकडेही त्याचे काही अवगुण होते. सत्तेसाठीचा दुराग्रह, त्यासाठी नीतिमत्तेला मूठमाती देण्याची तयारी, वाट्‌टेल त्या थराला जाण्याची तर्‍हा, पांडवांना बोटाच्या अग्रभागाइतकीही जमीन न देण्याची भूमिका स्वीकारून अकारण इरेला पेटणे, धृतराष्ट्रापासून तर कृपाचार्यांपर्यंत सर्वांना टाचेखाली चिरडण्याची मुजोरी... या, दुर्योधनाच्या वर्तणुकीतून झळकलेल्या बाबींचा प्रत्यय भाजपापेक्षाही कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या वागणुकीतून येतो क्षणोक्षणी. नीती-नियमांना तिलांजली देऊन सत्तेची लालसा बाळगणार्‍यांना अधिक शोभून दिसेल ना दुर्योधनाची उपमा!
 
आणि तसेही कौरव कोण अन्‌ पांडव कोण, याचा निवाडा जनता करेल लवकरच. तिला कळते व्यवस्थितपणे, इथे कोण कौरवाच्या भूमिकेत वावरतेय्‌ अन्‌ कोण कृष्णाच्या ते. खंबीरपणे उभे कुणाच्या पाठीशी राहायचं, हेही कळतेच जनतेला. आणि हो! आता प्रियांकाताईंनी कौरव, पांडवांची चर्चा उपस्थित केली आहेच, तर गांधारीची भूमिका सध्या कोण पार पाडते आहे, हेही स्पष्ट करून टाका एकदा. लायकी नसतानाही सत्तेच्या शिखरावर जाऊन बसण्याची पोराची हौस भागवण्यासाठी गांधारीनं तरी किती काळ डोळ्यांवर पट्‌टी बांधून ठेवायची, हेही स्पष्ट झाले पाहिजे ना एकदा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लोकांनी का सहन करायचा, त्यांनी का म्हणून उघड्या डोळ्यांनी पाहायचा, एका घराण्यानं सत्तेसाठी चालवलेला तमाशा?
सत्तेसाठी हपापलेल्यांनी, त्यासाठी आणिबाणीसारखा मार्ग चोखाळणार्‍यांनी शहाजोगपणे इतरांना दुर्योधनाच्या रांगेत नेऊन बसविण्यापूर्वी, एकदा आपण स्वत: नेमके कुठे फिट बसतो, याचाही अंदाज घ्यावा. निदान, जनतेच्या लेखी आपली गणना कौरवांच्या खेम्यात होते की पांडवांच्या सेनेत, याचा अंदाज बांधता आला, तरी आपल्या राजकीय विरोधकांना कुठल्या बाजूने तोलायचे हे तरी निश्चित करता येईल. हो ना, (वढेरा असूनही ‘गांधी’ म्हणवून घेण्यातच धन्यता मानणार्‍या) प्रियांका मॅडम!