राजीव गांधी यांच्या हत्येला भाजपा जबाबदार : अहमद पटेल
   दिनांक :09-May-2019
तभा ऑनलाईन 
नवी दिल्ली,  
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरून काँग्रेस-भाजपामध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर काँग्रेसकडून भाजपाला प्रत्युत्तर देण्यात आलेले आहे. काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी राजीव गांधी यांच्या हत्येला भाजपा जबाबदार असल्याचे विधान करीत भाजपावर पलटवार केला आहे. तत्कालीन सरकारने राजीव गांधी यांना अतिरिक्त सुरक्षा देण्यास नकार दिला होता. त्या सरकारला भाजपाने पाठिंबा दिल्याची आठवण अहमद पटेल यांनी करून दिली.
 
 
 
राजीव गांधी यांची हत्या झाली त्यावेळी केंद्रात डीएमके सरकार होते. त्या सरकारला भाजपाने पाठिंबा दिला होता. त्यामुळे काँग्रेसने थेट राजीव गांधी यांच्या हत्येसाठी भाजपाला जबाबदार धरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांचे आयुष्य भ्रस्टाचारी नंबर एक म्हणून संपले, अशी टीका जाहीर सभेत केली होती. त्यानंतर काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
 
काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी ट्विट करीत म्हटले आहे की, शहीद पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका करणे म्हणजे हे भाजपा कमकुवत झाले असल्याचे लक्षण आहे. मात्र, त्यांच्या हत्येला जबाबदार कोण? भाजपासमर्थित व्ही. पी. सिंह सरकार त्यावेळी सत्तेत होते. राजीव गांधी यांच्या जीवाला धोका असूनही त्या सरकारने त्यांना अतिरिक्त सुरक्षा देण्यास नकार दिला होता. गुप्तचर खात्याने राजीव गांधी यांच्या सुरक्षेला धोका असल्याची माहिती सरकारला दिली होती. पण, त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आज राजीव गांधी त्यांच्या तिरस्कारामुळे हयात नाहीत आणि त्यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी ते आपल्यामध्ये नाही म्हणून त्यांच्यावर आरोप लावले जात आहेत, असाही आरोप अहमद पटेल यांनी केला.