नामदाराच्या घराण्याने युद्धनौकेचा वापर सहलीसाठी केला : अरुण जेटली
   दिनांक :09-May-2019
नवी दिल्ली, 
नामदार घराण्यातील सदस्यांनी भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचा वापर सहलीची मजा घेण्यासाठी केला होता, तिथेच कामदार म्हणून काम करीत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाचा वापर पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करण्यासाठी केला, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज गुरुवार गांधी घराण्याला चिमटा काढला.
 
 
 
आयएनएस विराट या युद्धनौकेचा वापर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी व्यक्तिगत कारणासाठी केला होता. या युद्धनौकेतून त्यांना सहल काढायची होती. त्यावेळी त्यांचे इटलीचे जावई आले होते. युद्धनौकेतून विदेशी व्यक्तीला सहलीवर नेऊन त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली नव्हती काय? असा सवाल मोदी यांनी बुधवारी दिल्लीतील एका जाहीर सभेतून केला होता.
 
 
 
याच मुद्यावर एकामागोमाग ट्विट्‌स करताना जेटली यांनीही गांधी घराण्यावर हल्ला चढविला. राजीव गांधी यांच्या हत्येमागे तामिळनाडूतील द्रमुकचा हात होता, असा आरोप त्यावेळी काँग्रेसने केला होता आणि आता याच काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी द्रमुकशी आघाडी केली आहे, अशी टीकाही जेटली यांनी केली.