होणा-या बायकोनेच केला विनोदचा खून
   दिनांक :09-May-2019
भावी पत्नीला व प्रियकराला अटक
भंडारा: लग्नाच्या आदल्या दिवशी हत्या झालेल्या तरुणाच्या हत्येचे गुढ उकलण्यात अखेर तुमसर पोलिसांना यश आले असून भावी पत्नी आणि तिच्या प्रियकराने विनोदची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनाही 13 मे पर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
 

 
 
 
तुमसर तालुक्यातील येरली येथील विनोद कुंभरे या 28 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचे 6 मे रोजी सकाळी उघड झाले. 7 मे ला विनोदचा विवाह तिरोडा तालुक्यातील कोयलारी येथील रिना बाबुराव मडावी हिच्याशी होणार होता. त्यापुर्वीच त्याचा अशाप्रकारे खुन झाल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. तुमसर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून अखेर विनोदच्या हत्या-यांना अटक केली आहे. विनोदची होणारी बायको व तिचा प्रियकर प्रफुल्ल कृष्णा परतेती या दोघांनी मिळून नियोजनबध्दरित्या विनोदची हत्या केली. या प्रकरणात आणखी काही जण असल्याची शक्यता पोलिसांना आहे. प्रफुल्ल आणि रिना या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची 13 मे पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.