मुंबई महानगरपालिकेच्या हजारो कर्मचार्‍यांना एप्रिलमध्ये शून्य पगार

    दिनांक :09-May-2019
बायोमेट्रिकमुळे गोंधळ
 
मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील बायोमेट्रिक पद्धतीच्या गोंधळामुळे हजारो कर्मचार्‍यांना वेतन कपातीला सामोरे जावे लागत आहे. अनेक जणांना एप्रिलमध्ये शून्य पगार मिळाल्याच्या मासिक पावत्या दिल्या गेल्या असल्याचे समजते.
मुंबई महानगरपालिकेच्या एक लाख कर्मचार्‍यांपैकी 70 हजार कर्मचार्‍यांची बायोमेट्रिक पद्धतीतील गोंधळामुळे वेतन कपात करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या हातात शून्य पगाराची पावती पडली आहे. निवडणूक कामासाठी गेलेल्या कर्मचार्‍यांना सर्वाधिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. नैमित्तिक रजा, आठवडा सुटी आदीचे अपडेट न झाल्याने तसेच कामावर न आल्याचा शेरा पडल्याने मोठ्या प्रमाणात वेतन कपात झाली आहे. संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी कर्मचार्‍यांच्या सुट्यांचा हिशोब ठेवायचा की मानव संसाधन विभागाने, असा वाद निर्माण झाल्याचे कळते. दरम्यान, 12 मेपर्यंत कपात झालेले वेतन न मिळाल्यास आंदोलन करू, असा इशारा कामगारांच्या संघटनांनी दिला आहे.