1200 नाकर्त्या पोलिस अधिकार्‍यांवर केंद्राची नजर
   दिनांक :09-May-2019
नवी दिल्ली, 
 
भारतीय पोलिस दलातील सुमारे 1200 नाकर्त्या अधिकार्‍यांवर केंद्रीय गृहमंत्रालयाची नजर आहे. या अधिकार्‍यांवर लवकरच कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
 
 
 
गृहमंत्रालयाने मागील तीन वर्षांच्या काळात एकूण 1181 अधिकार्‍यांच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे. आढावा घेण्याची प्रक्रिया निरंतर सुरू राहणारी असल्याने, अशा नाकर्त्या अधिकार्‍यांची संख्या आणखी वाढू शकते, अशी माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
 
अ. भा. सेवा (मृत्यू आणि निवृत्तीनंतरचे फायदे) अधिनियमाच्या कलम 16(3) अंतर्गत 2016 ते 2018 या काळात हा आढावा घेण्यात आला आहे. केंद्र सरकार या नियमांतर्गत कोणत्याही अधिकार्‍याला, संबंधित राज्य सरकारशी चर्चा करून किमान तीन महिन्यांची लेखी नोटीस किंवा अशा नोटिशीसोबत तीन महिन्यांचे वेतन आणि भत्ते देऊन निवृत्त होण्याचे आदेश देऊ शकते.
ज्या नाकर्त्या 1181 अधिकार्‍यांवर मंत्रालयाची नजर आहे, त्यातील 10 अधिकार्‍यांना सार्वजनिक हितासाठी तत्काळ सेवानिवृत्त करण्याची शिफारस संबंधित राज्य सरकारला करण्यात आली आहे, असे अधिकारी म्हणाला.
 
देशभरात एकूण 4940 पोलिस अधिकार्‍यांची मंजूर पदे असून, त्यापैकी 3972 अधिकारी सध्या देशात कार्यरत आहेत. देशभरातील पोलिस अधिकार्‍यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याची सुरुवात नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळातच सुरू झाली, हे विशेष!