'स्वत:च्या अपयशाचे खापर दुसर्‍यांवर फोडणारे पहिलेच पंतप्रधान'
   दिनांक :09-May-2019
- काँग्रेसचा मोदींवर पलटवार
 
नवी दिल्ली,
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर सातत्याने टीका करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसने जोरदार पलटवार केला आहे. भाजपा राफेलवर चर्चा करण्यास तयार असल्यास आम्ही कोणत्याही मुद्यावर चर्चा करण्यास तयार असल्याचे  काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी म्हटले आहे. राजीव गांधींना वाजपेयी सरकारनं क्लीन चिट दिली होती, असा दावादेखील खेडा यांनी पत्रपरिषदेत केला.
 
 
 
मोदी सरकारला बोफोर्सवर चर्चा करायची असेल, तर आम्ही त्यासाठी तयार आहोत. आम्ही तुमच्यासारखे भित्रे नाहीत, असे म्हणत खेडा यांनी राफेलचा संदर्भ दिला. 2003 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. त्यावेळी मुकुल रोहतगी अतिरिक्त महाधिवक्ते होते. राजीव गांधींच्या विरोधात कोणतेही पुरावे नसल्याचे त्यावेळी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले होते. त्यानंतर वाजपेयींनी राजीव गांधींच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात न जाण्याच्या सूचना दिल्या होत्या, असेही खेडा यांनी सांगितले.
 
स्वत:च्या अपयशाचे खापर दुसर्‍यांवर फोडणारे मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान असल्याची टीका त्यांनी केली. मोदी आजही त्यांच्या अपयशाला जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी आणि काँग्रेस सरकारांना जबाबदार धरतात. मोदी पाच वर्षांत अपयशी ठरले. त्यामुळेच आता राजीव गांधींचे नाव घेऊन ते मूळ मुद्यांपासून पळ काढत आहेत, अशा शब्दांत खेडा यांनी मोदींचा समाचार घेतला. माहिती अधिकाराअंतर्गत वारंवार अर्ज करूनही मोदींच्या परदेश दौर्‍यांची, त्यावेळी त्यांच्यासोबत विमानात उपस्थित असलेल्यांची माहिती का दिली जात नाही? असे प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केले.