आचारसंहितेचे कारण सांगून दुष्काळ निवारणाची कामे अडवू नका- मुख्यमंत्री

    दिनांक :09-May-2019
मुंबई: दुष्काळी भागातील पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, टँकर मंजुरी, चारा छावण्या सुरू करणे, रोहयोमधील कामे यांना आचारसंहितेची कुठलीही अडचण येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने आचारसंहितेचे कारण सांगून कोणतेही प्रस्ताव थांबवू नये. दुष्काळ निवारणाच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी देऊन कामे सुरू करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुवारी अधिकार्‍यांना दिले.
 

 
 
मुख्यमंत्र्यांनी आज वर्षा निवासस्थानी ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून उस्मानाबाद, बीड आणि परभणी जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, अभियंते यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
टँकरसाठी 2018 च्या लोकसंख्येचा आधार
 
पाण्याचे टँकर सुरू करताना 2011 ची लोकसंख्या लक्षात न घेता 2018 ची लोकसंख्या लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. जनावरांसाठीही याच पद्धतीने पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकार्‍यांना दिले.
मुख्यमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील जनावरांची संख्या लक्षात घेऊन आवश्यक तेथे चारा छावण्या सुरू कराव्या. ज्या गाव परिसरात चारा छावणी नाही, अशा ठिकाणी गावातील जनावरांची संख्या लक्षात घेऊन त्याप्रमाणात टँकरचा पाणी पुरवठा वाढविण्यात यावा. दुष्काळी कामे, रोहयोची कामे, तातडीने सुरू होणार्‍या पाणी पुरवठा योजना यासाठी निवडणूक आचारसंहितेचा कोणताही अडथळा नसून, अधिकार्‍यांनी विविध आवश्यक कामांना तातडीने मंजुरी द्यावी, अशा कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.