पुण्यात साडीच्या दुकानाला आग

    दिनांक :09-May-2019
 
 
पुणे: पुण्यातील देवाची उरळी येथे आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास साडीच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या व दहा खाजगी टँकरच्या मदतीने तीन तासांत आगीवर
नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
 

 
 
पुण्यातील देवाची उरळी येथील राजयोग साडी गोडाऊनच्या सुमारे सात हजार चौरस फूट जागेवरील दुकानाला पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दुकानात झोपलेल्या कामगारांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला. राकेश रियाड, राकेश मेघवाल, धर्मराम वाडीयासार, सूरज शर्मा आणि धीरज चांडक अशी मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत.
या आगीत सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मृत्युमुखी पडलेले कामगार काम झाल्यानंतर दुकानातच झोपतात. त्यानंतर दुकानाला बाहेरून कुलूप लावले जाते. एका कामगाराने या घटनेची माहिती मालकाला मोबाईल फोनवरून दिली आणि आगीमुळे आम्हाला गुदमरत असून, बाहेर पडता येत नाही, आम्हाला वाचवा, असे सांगितले. यानंतर व्यवस्थापक दुकानाजवळ आला, पण तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. कुलुप काढताच आगीचा लोळ बाहेर पडला.
दुकानाच्या पाठीमागील भिंतींना भगदाड पाडून सकाळी सातच्या सुमारास सर्व कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या कामगारांनी खिडक्यांच्या काचा वाकवून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना बाहेर पडता आले नव्हते.
एका कामगाराचा
विवाह होणार होता!
यातील एका कामगाराचा विवाह अवघ्या महिनाभरावर आला होता. मूळचा राजस्थानचा पण सध्या पुण्यातील देवाची उरळी येथील राजयोग साडी सेंटरमध्ये काम करणार्‍या या कामगाराचे नाव राकेश मेघवाल असे आहे. लग्नाच्या तयारीसाठी तो गुरुवारी सकाळी गावाला जाणार होता, पण नियतीने त्याचा घात केला आणि या आगीत होरपळून त्याचा मृत्यू झाला.