चांदनी चौक जागेवर जीएसटीचा प्रभाव
   दिनांक :09-May-2019
श्यामकांत जहागीरदार
 
 
राजधानी दिल्लीतील व्यापारी क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. हर्षवर्धन, कॉंग्रेसचे जयप्रकाश अग्रवाल आणि आपचे पंकज गुप्ता यांच्यात तिरंगी लढत होत आहे. जीएसटीची मोठी समस्या या मतदारसंघात भाजपाला भेडसावते आहे.
2014 मध्ये या मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत भाजपाचे डॉ. हर्षवर्धन यांनी आपचे आशुतोष यांचा 1 लाख 36 हजार मतांनी पराभव केला होता. डॉ. हर्षवर्धन यांना 4 लाख 37 हजार 938 तर आशुतोष यांना 3 लाख 1 हजार 618 मते मिळाली होती. कॉंग्रेसचे कपील सिब्बल 1 लाख 76 हजार 206 मते घेत तिसर्‍या स्थानावर होते. कपिल सिब्बल या मतदारसंघातील विद्यमान खासदार होते.
 

 
 
भाजपाने यावेळी पुन्हा डॉ. हर्षवर्धन यांना उमेदवारी दिली आहे. आशुतोष यांनी आपमधून भ्रमनिरास झाल्यामुळे राजीनामा देत राजकारण संन्यास घेतला आहे, तर आप आणि कॉंग्रेस यांच्यात आघाडी न झाल्यामुळे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री असलेल्या कपिल सिब्बल यांनी यावेळी पराभवाच्या भीतीने निवडणूक लढण्यास नकार दिला.
2009 मध्ये कॉंग्रेसचे कपिल सिब्बल यांनी चांदनी चौक मतदारसंघातून विजयी होत हा मतदारसंघ आपल्याकडे कायम राखला. त्यांनी भाजपाचे विजेंदर गुप्ता यांचा 2 लाख मतांनी पराभव केला होता. सिब्बल यांना 4 लाख 65 हजार 713 तर गुप्ता यांना 2 लाख 65 हजार मते मिळाली होती. बसपाचे मोहम्मद मुस्तकीम 26 हजार मते घेत तिसर्‍या स्थानावर होते.
2004 मध्ये कॉंग्रेसचे कपिल सिब्बल यांनी भाजपाच्या स्मृती इराणी यांचा 79 हजार मतांनी पराभव केला होता. यावेळी सिब्बल यांना 1 लाख 27 हजार 395 तर स्मृती इराणी यांना 47928 मते मिळाली होती.
कॉंग्रेसचे उमेदवार असलेले जयप्रकाश अग्रवाल सर्वप्रथम 1984 मध्ये या मतदारसंघातून विजयी झाले. त्यानंतर 1989 मध्येही त्यांनी हा मतदारसंघ आपल्याकडे कायम ठेवला. 1996 मध्ये अग्रवाल पुन्हा या मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र 1998 आणि 1999 मध्ये मात्र भाजपाच्या विजय गोयल यांनी त्यांचा पराभव केला. या मतदारसंघाचे खासदार असल्यामुळे तसेच अनेक वेळा येथून निवडणूक लढवल्यामुळे अग्रवाल यांची या मतदारसंघावर चांगली पकड आहे.
1967 मध्ये भारतीय जनसंघाचे रामगोपाल शालवाले तर 1977 मध्ये जनता पक्षाचे सिकंदर बख्त या मतदारसंघातून विजयी झाले होते. या मतदारसंघातून सलग दोनदा निवडून येण्याचा मान याआधी जयप्रकाश अग्रवाल, कपिल सिब्बल आणि विजय गोयल यांच्याकडे आहे. यावेळी या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी डॉ. हर्षवर्धन यांना आहे.
भाजपा उमेदवार डॉ. हर्षवर्धन यांची जनमानसातील प्रतिमा ही त्यांची जमेची बाजू आहे. मोदी सरकारने पाच वर्षाच्या काळात केलेली विकासकामे यामुळे निवडणुकीत डॉ. हर्षवर्धन यांची बाजू आणखी भक्कम झाली आहे. चांदनी चौक मतदारसंघ हा आधी सांगितल्याप्रमाणे व्यापारीबहुल असल्यामुळे या मतदारसंघात जीएसटीचा मुद्दा प्रभावी ठरत आहे. सरकार कितीही नाही म्हणत असले तरी जीएसटीचा व्यापार्‍यांना विशेषत: छोट्या व्यापार्‍यांना चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे हा मुद्दा भाजपा कशा पद्धतीने हाताळते, त्यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे.
आदर्शनगर, शकुरबस्ती, शालीमार बाग, त्रिनगर, वझीरपूर, सदरबाजार, मॉडेल टाऊन, मटियामहल, बल्लीमारन आणि चांदनी चौक असे दहा विधानसभा मतदारसंघ चांदनी चौक लोकसभा मतदारसंघात येतात.
चांदनी चौक मतदारसंघातील आपच्या आमदार अलका लांबा यांचे आपच्या नेतृत्वाशी असलेले मतभेद आपचे उमेदवार पंकज गुप्ता यांच्यासाठी अडचणीचे ठरत आहेत. आपने अलका लांबा यांना झटकून टाकले आहे. अलका लांबा यांनी अद्याप आपचा राजीनामा दिला नसला तरी त्या आपपासून मनाने खूप दूर गेल्या आहेत.
बल्लीमारन, मटियामहल आणि चांदनी चौक हे या लोकसभा मतदारसंघातील तीन मुस्लिमबहुल भाग. या तीनही विधानसभा मतदारसंघात तसेच यातील महापालिका क्षेत्रात भाजपाला आतापर्यंत एकदाही विजय मिळवता आला नाही. मात्र या तिन्ही विधानसभा मतदारसंघातूनही भाजपाला मतदान होते, असे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. आपल्या विजयाबद्दल डॉ. हर्षवर्धन पूर्ण आश्वस्त आहेत. कॉंग्रेस आणि आप यांच्यात दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकासाठी लढत होत असल्याचा दावा डॉ. हर्षवर्धन यांनी केला.
अरुंद रस्ते, गर्दी आणि त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी ही चांदनी चौक मतदारसंघाची समस्या आहे. आपचे उमेदवार पंकज गुप्ता यांनी चांदनी चौकसाठी आपले वेगळे संकल्पपत्र जाहीर केले आहे. यात रस्त्याचे रुंदीकरण तसेच सुरक्षेच्या दृष्टीने 40 हजार कॅमेरे लावण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. कॉंग्रेस आणि आप यांच्यात आघाडी झाली असती तर भाजपाला चांदनी चौकच नाही तर दिल्लीतल सातही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक कठीण गेली असती. 2014 मध्ये चांदनी चौक मतदारसंघात आप आणि कॉंग्रेस उमेदवारांच्या मतांची बेरीज भाजपा उमेदवारांच्या मतांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आप आणि कॉंग्रेस वेेगवेगळे लढत असल्यामुळे त्याचा भाजपाला फायदा होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. या मतदारसंघाचा कौल कुणाला मिळतो, भाजपाचे डॉ. हर्षवर्धन हा मतदारसंघ आपल्याकडे कायम राखण्यात यशस्वी होतात का याचे उत्तर 23 मेला मिळणार आहे.