भारतीय हॉकी संघाची सकारात्मक सुरुवात; थंडरस्टिक्स संघावर २-० ने विजय

    दिनांक :09-May-2019
पर्थ,
भारतीय पुरुष हॉकी संघाने बुधवरी पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या थंडरस्टिक्स संघावर २-० ने विजय नोंदवून ऑस्ट्रेलिया दौऱ्याची  सकारात्मक सुरुवात केली.
 
 
 
वीरेंद्र लाक्रा याने २३ व्या तसेच हरमनप्रीतने ५० व्या मिनिटाला गोल केला. भारताला १५ तसेच १७ मे रोजी ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाविरुद्ध सामने खेळायचे आहेत. उभय संघांनी पहिल्या क्वॉर्टरमध्ये वेगवान खेळ करीत गोल नोंदविण्याच्या उत्कृष्ट संधी निर्माण केल्या होत्या. जसकरणसिंग याला पाचव्या मिनिटाला गोल नोंदविण्याची संधी मिळाली होती पण तो चुकला. हरमनप्रीत आणि रुपिंदरपालसिंग यांनी बचावफळीत दमदार कामगिरी करीत थंडरस्टिक्सचे हल्ले थोपवून लावले.
दुस-या क्वॉर्टरमध्ये मनप्रीत आणि मनदीप प्रतिस्पर्धी गोलफळी भेदण्यात अपयशी ठरले. भारताला अखेर २३ व्या मिनिटाला लाक्राने आघाडी मिळवून दिली.
तिसरा क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघांनी बरोबरीची झुंज दिली. यजमान संघ भारतीय खेळाडूंवर वर्चस्व गाजवित राहिला, मात्र चौथ्या आणि अखेरच्या क्वॉर्टरमध्ये ५० व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर अखेर हरमनप्रीत याने गोल नोंदवून भारतीय संघाची आघाडी दुप्पट केली. यामुळे यजमान आणखी दडपणाखाली आले. सामना संपायला तीन मिनिटे शिल्लक असताना यजमानांना सलग तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण भारतीय खेळाडूंनी यजमान खेळाडूंचे मनसुबे उधळून लावले. भारताला पुढील सामना ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध १० मे रोजी खेळायचा आहे.