आंतरजातीय विवाह केल्याने जावयावर गोळीबार

    दिनांक :09-May-2019
 पुणे: पुतणीशी आंतरजातीय विवाह केल्यावरून काका, भाऊ आणि त्याच्या मित्रांनी एका तरुणावर पाच गोळ्या झाडल्या. ही घटना बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास हिंजवडीमधील चांदणी चौकातील बंद पडलेल्या पेट्रोल पंपासमोर घडली. तुषार प्रकाश पिसाळ असे जखमी तरुणाचे नाव आहे. या घटनेप्रकरणी राजू तावरे, आकाश तावरे, सागर तावरे, सागर पालवे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
 

 
 
पोलिसांनुसार, काही दिवसांपूर्वी तुषार याचा आंतरजातीय विवाह विद्या नावाच्या तरुणीशी झाला. मात्र, तिच्या कुटुंबाची संमती नव्हती. बुधवारी तुषार आणि त्याचे दोन मित्र तानाजी आणि बबन दुचाकीवरून नातेवाईकाकडे विवाह सोहळ्यानिमित्त गेले होते. परत येत असताना ते चांदणी चौकातील बंद पडलेल्या पेट्रोल पंपासमोर पोहोचले. यावेळी विद्याचे काका राजू तावरे, तिचे दोन भाऊ आकाश तावरे, सागर तावरे आणि त्यांचा मित्र सागर पालवे यांनी तुषारला घेराव घातला. राजूने तुषारवर पिस्तुलातून मागून व पुढून अशा एकूण पाच गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात तुषारच्या पाठीत, पोटात आणि छातीमध्ये गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला. यानंतर तुषारला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, राजू, आकाश, सागर व सागर पालवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तिघांना अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी दिली.