दोन मिनिटांत IPL फायनलच्या सर्व तिकिटांची विक्री !

    दिनांक :09-May-2019
हैदराबाद, आयपीएल 2019 
इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या पर्वाचा अंतिम सामना येत्या रविवारी होणार आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेली फायनल लढत याची देही... पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक होते. मात्र, त्यांच्या या आनंदावर दोन मिनिटांतच विरजण फिरले. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे आणि त्या सामन्याची तिकीटं अवघ्या दोन मिनिटांत विकली गेली. त्यामुळे चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे आणि त्यांनी तिकीट विक्रीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
 
 
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) मंगळवारी कोणतीही पूर्वकल्पना न देता अंतिम सामन्याच्या तिकिटांची ऑनलाईन विक्री सुरू केली. बासीसीआयच्या या निर्णयाने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला, परंतु त्याहीपेक्षा ही तिकिटं दोन मिनिटांत संपल्यामुळे त्यांचा राग अनावर झाला. हैदराबाद क्रिकेट संघाच्या कार्यकारी समितीच्या सदस्याने विचारले की,''दोन मिनिटांत सर्व तिकीटं कशी विकली जाऊ शकतात? ही अचंबित करणारी गोष्ट आहे आणि बासीसीआयला याचे उत्तर द्यावे लागेल.
ऑनलाईन तिकीट विक्री करणाऱ्या कंपनीकडून सुधीर रेड्डी यांनी सांगितले की,''मी कोणतीच माहिती देऊ शकत नाही. आम्हाला जेवढी तिकीटं देण्यात आली ती आम्ही विकली. याव्यतिरिक्त अधिक माहिती हवी असल्यास ती बीसीसीआयकडे विचारावी.''