न्या. भूषण गवई बहुप्रतिभेचे धनी
   दिनांक :09-May-2019
नागपूर: सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आलेले मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई बहुप्रतिभेचे धनी आणि सामाजिक जाणिवेचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. कॉलेजियमने त्यांची या पदावर नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे.
 


 
 
न्या. गवई यांनी नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती म्हणून काम केले आहे. न्या. गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावती येथे झाला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटाचे संस्थापक अध्यक्ष व केरळ, सिक्कीम, बिहारचे राज्यपाल रामकृष्ण उपाख्य दादासाहेब गवई यांचे ते पुत्र आहेत. गवई यांनी 1985 पासून वकिली व्यवसायाला सुरुवात केली. माजी अ‍ॅडव्होकेट जनरल व उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बॅरि. राजा एस. भोसले यांच्यासोबत त्यांनी 1987 पर्यंत काम केले. त्यानंतर 1987 ते 1990 या काळात त्यांनी स्वतंत्र वकिली व्यवसाय सुरू केला. 1990 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात संवैधानिक कायदा व प्रशासकीय कायदा यामध्ये वकिलीचा सराव केला. त्यादरम्यान नागपूर महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका व अमरावती विद्यापीठासाठी स्थायी सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. स्वायत्त संस्था, सीकॉम, डीव्हीसीएल तसेच विदर्भातील विविध नगरपरिषदांचे वकील म्हणूनही त्यांनी बाजू मांडली. ऑगस्ट 1992 ते जुलै 1993 दरम्यान नागपूर खंडपीठात ते सहायक सरकारी वकील होते. 17 मार्च 2000 मध्ये त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. तद्नंतर 14 नोव्हेंबर 2003 रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली.
न्या. भूषण गवई यांनी नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती म्हणून काम करताना अनेक जनहित याचिकांवर महत्त्वपूर्ण निर्णयही दिले आहेत. त्यांच्या नियुक्तीच्या शिफारशीबद्दल विधि वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.