शिवणी येथील एटीएम फोडून रोकड लंपास
   दिनांक :09-May-2019
मंगरुळनाथ तालूक्यातील घटना
मंगरुळनाथ: तालुक्यातील शिवणी (रोड) येथील स्टेट बँकेचे एटीएम फोडून त्यामधील १३ लाख ३० हजार ३०० रुपये अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याची घटना ता ८ ते ९ च्या रात्री दरम्यान घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून गतवर्षी सुद्धा याच बँकेच्या एटीएम वर चोरट्यानी डल्ला मारला होता.
 

 
 
याबाबत पोलीस चॅनल मॅनेजर राहुल गहुले यांनी पोलिसांत तक्रार दिली की, मी ईपीएस मुख्यालय मुंबई या कंपनीत चॅनल मॅनेजर या पदावर काम पाहतो.शिवणी रोड येथील एसबीआय च्या एटीएम चे सुद्धा काम माझ्याकडे असून ता नऊ रोजी सकाळी मला एटीएम जागेचे मालक अनिल चव्हाण यांचा फोन आला की,शिवणी येथील एटीएम अज्ञात चोरट्यानी फोडले आहे.ही माहीती मी वरीष्टाना दिली व आम्ही अकोला येथून शिवणी येथे पाहोचलो असता अज्ञात चोरट्याने एटीएम मशीन गॅस कटर ने कापून त्यातील १३,३०,३०० रुपये रोख चोरून नेले व एटीएम मशीन चे साडे तीन लाख रुपयांचे नुकसान केले.अशा तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३८०,४२७ भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान घटनास्थळावर जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी,अति.अधीक्षक डॉ पवन बन्सोड, एसडीपीओ नंदा पाराजे,एपीआय विजय रत्नपारखी,पीएसआय मंजुषा मोरे व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटना स्थळावर भेट देऊन पाहणी केली.तसेच श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना सुद्धा पाचारण करण्यात आले होते.
गतवार्षिसुद्धा याच ठिकाणचे एटीएम चोरट्यानी फोडले होते त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच याठिकाणी बँकेने सुरक्षा रक्षक ठेवला नसल्याचे समजते.