सॉरी! मी व्यस्त आहे!!

    दिनांक :09-May-2019
डॉ. पूजा फाळके
 
मला लिहिणं वगैरे असं खूप काही जमत नाही. पण वाटतं कधी कधी मनातलं बोलाव, लिहावं आणि पोहोचवावेत आपले विचार चारचौघांपर्यंत! हल्ली पूर्वीसारखी नात्यांमधली ओढ कमी होत चाललेली दिसते आणि म्हणून हा सर्व प्रपंच. नेमकं कुठलं कारण असावं ? खूप कामाचा व्याप, भविष्याची चिंता, घरातले कलह, की आपण आजच्या स्पर्धेत मागे पडतोय्‌ हा न्यूनगंड? कारण कुठलेही असू देत, शेवटी यातून निष्पत्ती काय, याकडे आपण बघायला हवं. सध्या एक शब्द फार प्रचलित आहे.‘बिझी!’ बहुतांश लोकांचं एक वाक्य ठरलेलेच असतं की मी फार बिझी आहे. मला अजिबात वेळ नाही. हे सांगून तो स्वतःला फसवतो आहे की समोरच्याला हेच कळत नाही. कारण कुठलाही व्यक्ती २४ तास सलग काम करूच शकत नाही. 
 
 
आपल्या शरीराला जशी थोडावेळ विश्रांतीची गरज असते ना, तशीच आपल्या मनाला सुद्धा विश्रांतीची गरज असते, पण खरं तर आपण जगत असतो शरीराला यातना देऊन आणि भावनाशून्य होऊन! आपलं काम, आपले प्रॉब्लेम्स, आपली मानसिकता दिवसभर फक्त हेच सोबत घेऊन सोबत असतो ना आपण. आता या सर्व धावपळी मधून स्वतःला वेळ देणार तो केव्हा ? मी माझ्याकडे येणार्‍या पेशन्टला जेव्हा सांगत असते सकाळी दहा मिनिटे तरी योगा करत चला तर त्यातील ५० टक्के लोक हेच सांगतात वेळच नसतो या गोष्टींसाठी. खरेच आपण एवढे बिझी आहोत का? स्वतःसाठी आपण दहा मिनिटे सुद्धा काढू शकत नाही. परमेश्वराने जे सुंदर जीवन आपल्याला दिलेल आहे, त्याची काहीच किंमत नाही का ? असो! प्रत्येकाचं ज्याचं त्याचं स्वतंत्र आयुष्य आहे आणि ते कसं जगावं, हे त्यांचं त्यांनी ठरवायचं असतं. मला नात्यातील अंतर काय ? हे सांगायचं आहे. मी फार बिझी आहे मला वेळ नाही, या सर्व दुनियादारीच्या गोष्टी आहेत. मात्र आज आपण आपल्या जवळच्या नात्यांमध्ये या बाबी अमलात आणतो, मग ते नातं कुठलंही असो. आई-वडिलांसह बहीण-भावांचं, मुलांचं किंवा मैत्रीचं एवढंच काय, तर पती-पत्नीचं सुद्धा! आई-वडिलांना मुलांचा पैसा नको असतो. त्यांनाही वाटतं की मुलांनी थोडा वेळ आपल्या सोबत घालवावा. कारण आपण लहान असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला अमूल्य वेळ फक्त आपल्यासाठी दिलेला असतो.
 
अशावेळी आपण त्यांना वेळ देऊ शकलो नाही तर नातं दुरावणारच. बालपणी एकमेकांशी भांडणारे आणि लगेच परत गट्टी करणारे भाऊ-बहीण मोठे झाले की एकमेकांशी बोलायला तयार नसतात, तेव्हा नातं दुरावतच. दिवसभर आई-वडिलांच्या येण्याची वाट पाहत थांबलेलं मूल जेव्हा आपल्या जवळ येतं... आणि आपण त्याला वेळ देऊ शकत नाही, तेव्हां नातं दुरावतच. रोज सकाळपासून रात्रीपर्यंत हजारो संदेश मित्र-मैत्रिणींना पाठवत असतो आणि प्रत्यक्षात त्यांना जेव्हा आपल्या मदतीची गरज असते तेव्हा, मैत्रीच परकी होऊन जाते. जोडीदारांनी एकमेकांना वेळ द्यावा ही अपेक्षा चुकीची नसते. मित्रांनो, आयुष्य खरच सुंदर आहे. ते जगायला शिका... आपल्यासाठी आणि आपल्या सोबत जगणार्‍या, आपल्यावर प्रेम करणार्‍या त्या सर्व लोकांना आपल्या वेळेची गरज आहे आणि अर्थात आपल्या मायेची सुद्धा.