निवडणूक काळात दोन हजाराच्या नोटा गायब!
   दिनांक :09-May-2019
नवी दिल्ली, 
 नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकारने चलनात आणलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा ऐन निवडणुकीच्या काळात अचानक चलनातून गायब झाल्या आहेत. यामुळे भारतीय रिझर्व्ह बँक आणि अन्य बँकाही अवाक्‌ झाल्या आहेत.
 

 
 
लोकसभा निवडणुकीत काळा पैसा रोखण्याचा दावा निवडणूक आयोगाकडून केला जात आहे; मात्र बाजारात दोन हजारांच्या नोटा दिसत नसल्यामुळे, या नोटा मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आल्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिझर्व्ह बँकेनुसार, सुमारे 50 टक्के नोटा बाजारात खेळत्या आहेत. तर बँकांमध्ये केवळ 500 आणि 200 रुपयांच्याच नोटांचे येणे-जाणे सुरू आहे. यामुळे दोन हजाराच्या नोटांचा काळाबाजार होत आहे काय, अशी शंका घेतली जात आहे. याचा परिणाम बँकांच्या व्यवहारावर होताना दिसत आहे.
 
कानपूरमधील चलन साठ्याचा ताळेबंद पाहिल्यास, दोन हजार रुपये नोटांच्या एकूण संख्येच्या 20 टक्केच नोटा शिल्लक आहेत, तर रिझर्व्ह बँकेकडून जारी केलेल्या नोटांपैकी 50 टक्के हिस्सा बाजारात आहे.
 
बँकेच्या सूत्रानुसार, दोन हजार रुपयांच्या नोटा बँक, बाजार आणि एटीएममधून दररोज कमी होत आहेत. त्याजागी 500 आणि 200 रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणावर वापरल्या जात आहेत. दोन हजाराच्या 80 टक्के नोटा लोकांच्या तिजोर्‍यांमध्ये ठेवलेल्या आहेत. या नोटांना मोठमोठ्या व्यवहारांमध्ये वापरले जात आहे. कानपूरमध्ये निवडणूक काळात पकडली गेलेली 4 कोटींची रक्कम या दोन हजाराच्या नोटांचीच होती.