बिच्चारा राजा!
   दिनांक :09-May-2019
 
 
बिच्चारा राजा!
 विनोद देशमुख
 
लोकशाहीची कमाल बघा. नवाबांचे शहर असलेल्या भोपाळमध्ये राघोगढचा राजा सध्या मतांची भीक मागत आहे! हा राजा म्हणजे दिग्विजयिंसह उपाख्य दिग्गीराजा. मध्यप्रदेशाचे माजी मुख्यमंत्री, कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि राघोगढ संस्थानचे राजकुमार! पूर्वीच्या ग्वाल्हेर राज्यातील राघोगढचे राजे होते दिग्गीराजाचे वडील बलभद्रिंसग. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते अपक्ष आमदार म्हणून निवडूनही आले. याच मतदारसंघातून पुढे दिग्गीराजा अनेकदा कॉंग्रेसचे आमदार झाले आणि मंत्री, मुख्यमंत्री बनले. ते लोकसभा आणि राज्यसभा सदस्यही राहिले. राघोगढचे नगराध्यक्ष म्हणून सुरुवात करून गेली पन्नास वर्षे सक्रिय राजकारणात राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे आणि आता वयाच्या 72 व्या वर्षी भोपाळहून खासदारकीसाठी ते उभे आहेत.
अर्थात लोकसभा निवडणुकीची पाळी त्यांच्यावर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आणली! मध्यप्रदेशाच्या कॉंग्रेस राजकारणात दिग्विजयिंसग आणि कमलनाथ यांच्यातून विस्तव जात नाही. दोघांचे दोन गट आहेत. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी दिग्गीराजाला बाजूला सारून सर्व सूत्रे कमलनाथांच्या हातात दिली. त्यांनी कमाल दाखविली आणि भाजपाची पंधरा वर्षांची सत्ता उलथवून कॉंग्रेसला परत आणले. सध्या ते मध्यप्रदेशाचे राजे आहेत! पण तरीही दिग्गीराजाची लुडबुड सुरूच आहे. हे पाहून कमलनाथांनी एक इलाज केला.
 
 
 
आतापर्यंत कॉंग्रेसने एकदाही न जिंकलेल्या लोकसभा मतदारसंघातून लढून जिंकून दाखवा, असे जाहीर आव्हान त्यांनी दिग्गीराजाला दिले. भोपाळमध्ये अगदी तशीच काही स्थिती नाही. पण गेली तीस वर्षे तेथे भाजपा खासदार आहे. त्याआधीही, जगन्नाथराव जोशी आणि आरिफ बेग हे जनसंघाचे खासदार राहिले. त्याअर्थाने भोपाळ हा भाजपाचा गडच मानला पाहिजे. तेथे कॉंग्रेसने दिग्गीराजाला टाकले अन्‌ भाजपाने साध्वी प्रज्ञा सिंह यांना उतरवून त्यांच्या अडचणीत भरच घातली.
हिंदू दहशतवादी असा शब्दप्रयोग मुद्दाम शोधून काढणारे दिग्गीराजा आता स्वत:च हिंदू... हिंदू... करीत मतांची भीक मागत फिरत आहेत; एवढी त्यांची पंचाईत झाली आहे. मुख्यमंत्री असताना हेच दिग्विजयिंसग दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे न चुकता दर्शन घेत असत. त्यांनी नर्मदा परिक्रमाही केली. परंतु, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण झाले आणि ते एकदम हिंदू दहशतवादाबद्दल बोलायला लागले! आणि आता, त्याच प्रकरणातील संशयित आरोपी साध्वी समोर आल्याबरोबर तेच दिग्गीराजा कट्टर हिंदुत्ववाद्यांपेक्षाही दोन पावले पुढे असल्याचे भासवत आहेत. टीव्ही अँकर पत्नीला घेऊन देवळे फिरत आहेत, होमहवन करताहेत, साधू-संतांची मदत घेत आहेत! भाजपाच्या गोटातील कॉम्प्युटरबाबाला त्यांनी फितविले. ही वेळ आणली निवडणुकीने, भाजपाने, साध्वीने दिग्गीराजावर! कालाय तस्मै नम: म्हणतात ते हेच. दहा वर्षे मुख्यमंत्री राहिलेला राजा विरुद्ध साध्वी, असा उत्कंठापूर्ण सामना भोपाळमध्ये झडत आहे, एवढे नक्की.