नवज्योतसिंग सिद्धूंच्या दिशेने महिलेने फेकली चप्पल; सभेत 'मोदी.. मोदी..'च्या घोषणा
   दिनांक :09-May-2019
नवी दिल्ली ,
काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू सभेतून सतत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत आहे. असे असतानाही त्यांच्या हरयाणामधील एका सभेत चक्क नरेंद्र मोदींच्याच घोषणांचा आवाज घुमला. याशिवाय एका महिलेने त्यांच्या दिशेने चप्पल फेकल्याची घटना घडली.
 
 
हरयाणामधील रोहतकमध्ये काँग्रेसचे उमदेवार दिपेंद्र हुड्डा यांच्या प्रचारार्थ नवज्योत सिंग सिद्धूंची बुधवारी (दि.8) सभा झाली. या सभेदरम्यान उपस्थितांनी 'मोदी.. मोदी..' अशा घोषणा दिल्या. तर, यावेळी एका महिलेने त्यांच्या दिशेने चप्पल फेकली. ही चप्पल व्यासपीठाजवळ येऊन पडली. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे.
 
 
नवज्योतसिंग सिद्धूंच्या दिशेने चप्पल फेकणाऱ्या महिलेचं नाव जितेंद्र कौर सांगण्यात येत आहे. जितेंद्र कौर हिने आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी तिने असे कृत्य केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तर, नवज्योत सिंग सिद्धूंचे भाजपात काही चालले नाही म्हणून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आधी ते सोनिया गांधी आणि मनमोहन यांच्यावर टीका करत होते आणि आता नरेंद्र मोदींवर करत आहेत, असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या जितेंद्र कौरने म्हटले आहे.