परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्यापुढे भारत-चीन संबंध सुधारण्याचे आव्हान

    दिनांक :01-Jun-2019
नवी दिल्ली,
माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्रिपदाचा कार्यभार शुक्रवारी स्वीकारला असून, आता भारत-चीन संबंध सुधारण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. जयशंकर हे चीन व अमेरिका संबंधाविषयक तज्ज्ञ असून, ते पाकिस्तानशी संबंधांबाबतच्या धोरणात नेमके काय बदल करतात याचीही उत्कं ठा वाढलेली आहे.
 
 
 
जी-20, शांघाय सहकार्य संघटना, ब्रिक्स या आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांना लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स, जपान, युरोपीय महासंघ यांच्याशी व्यापार व संरक्षण संबंध सुधारण्यास ते प्राधान्य देतील, अशी राजकीय निरीक्षकांना अपेक्षा आहे. 2017 मध्ये डोकलाम पेचप्रसंगात भारत-चीन या दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांपुढे उभे ठाकले असताना त्यांनी परराष्ट्र सचिव म्हणून मोठी कामगिरी बजावली होती. संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाचे स्थायी सदस्यत्व, अणुपुरवठादार गटाचे सदस्यपद मिळवणे ही दोन आव्हानेही त्यांच्यापुढे आहेत. आखाती देशात संबंध वाढवणे, तसेच हायड्रोकार्बनची रेलचेल असलेल्या मध्य आशियातही संपर्क वाढवणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे.