अमित शाह यांनी गृहमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला

    दिनांक :01-Jun-2019
अमित शाह यांनी शनिवारी दुपारी गृहमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला असून राजनाथ सिंह यांनी देखील संरक्षण मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला आहे. कार्यभार स्वीकारल्यानंतर अमित शाह यांनी गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा केली. यानंतर अमित शाह हे अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकही घेणार आहेत.
 
 
शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळातील खातेवाटप जाहीर करण्यात आले होते. यानुसार नव्या मंत्रिमंडळात भाजपचे अध्यक्ष अमित शहा केंद्रीय गृहमंत्री बनले असून त्यांच्यावर देशाच्या कायदा-सुव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी असेल. राजनाथ सिंह हे गृहमंत्रालयातून संरक्षण मंत्रालयात गेले असून निर्मला सीतारामन यांच्याकडे संरक्षणानंतर आता अर्थ खाते सोपविण्यात आले आहे. अपेक्षेप्रमाणे एस. जयशंकर हे नवे परराष्ट्रमंत्री बनले आहेत.
अमित शहा यांच्याकडे अतिमहत्त्वाचे गृह खाते आल्यामुळे ते केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधानांनंतर सर्वात ज्येष्ठ मंत्री बनले आहेत. शिवाय, संरक्षणविषयक मंत्रिगटातही त्यांचा समावेश झाला आहे. त्यामुळे देशाच्या अंतर्गत आणि बाह्य़ सुरक्षेसंदर्भातील निर्णयप्रक्रियेतही त्यांचा सहभाग असेल. शनिवारी सकाळी अमित शाह यांनी गृहमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. या प्रसंगी जी किशन रेड्डी आणि नित्यानंद राय हे दोन नेतेही उपस्थित होते.
अमित शहा हे गृहमंत्री म्हणून काश्मीरमधील लष्कराविरोधी दंगे तसेच पश्चिम बंगाल तसेच अन्य राज्यांतील घुसखोरांबाबत कठोर भूमिका घेतील, असा अंदाज आहे. निवडणूक प्रचारात त्यांनी या मुद्दय़ांवर भर दिला होता. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला चालना देणे, काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० आणि ३५ अ रद्द करणे, बांगला देशी घुसखोरांची हकालपट्टी यांना ते प्राधान्य देतील, असा तर्क आहे.