पूजनात का असतात केळी?

    दिनांक :01-Jun-2019
हिंदू धर्मातल्या प्रत्येक पूजेत केळ्याला महत्त्वाचं स्थान दिलं जातं. पूजा सत्यनारायणाची असो वा दिवाळीतली, पूजन साहित्यात केळ्याचा समावेश असतोच. सत्यनारायणाचा प्रसाद मानलं जात असल्याने केळं कधीही खराब होत नाही, असं म्हणतात. अर्थात हे पुराणात नमूद करण्यात आलंय. पण यापेक्षा वेगळा विचार कधी केलाय का? म्हणूनच केळ्याला पूजनात महत्त्वाचं स्थान का बरं दिलं गेलं असावं, हे जाणून घेणं उत्सुकतेचं ठरू शकतं. केळ्याच्या झाडात देवगुरू ब्रृहस्पतीचा वास असतो असं म्हणतात. सलग सात गुरूवार केळ्याची पूजा केल्याने सगळ्या मनोकामना पूर्ण होतात, असं शास्त्रांमध्ये नमूद करण्यात आलंय. 

 
 
केळ्याच्या वृक्षात गुरू बृहस्पतींसोबतच श्रीविष्णूंचाही वास असतो, असं मानलं जातं. म्हणूनच केळ्याची पूजा गुरूवारी केली जाते. श्रद्धा आणि भक्तीभावाने केळ्याच्या झाडाची पूजा केली तर श्रीविष्णू प्रसन्न होतो, अशी श्रद्धा आहे. केळं सौभाग्य आणि सुखाचं प्रतिक मानलं जातं. केळ्याच्या पूजनाने गुरूसंबंधीचे दोष दूर होतात. घरात केळ्याची पूजा केल्याने चांगले लाभ होतात. असं असलं तरी घरात केळ्याचं रोपटं असू नये. घरात केळ्याचं रोपटं आणल्यास घरच्या प्रमुखाच्या प्रगतीत बाधा येतात, असं म्हटलं जातं. केळ्याचं झाड अंगणात लावायला हवं. झाडाची पूजा पारंपरिक पद्धतीने केली गेली पाहिजे.
 
केळ्याच्या पूजनाची ठराविक पद्धत आहे. त्यानुसार ब्राह्म मुहुर्तावर उठून मौनव्रताचं पालन करा. लवकर स्नान करून घ्या. केळ्याच्या झाडाला नमस्कार करून जल अर्पण करा. त्यानंतर हळद कुंकू वहा. चणा डाळ आणि गुळ अर्पण करा. अक्षता, फुलं वहा. प्रदक्षिणा घाला. घराबाहेरच्या केळ्याच्या झाडाची या पद्धतीने पूजा केली पाहिजे. या पूजनामुळे विष्णू प्रसन्न होतो आणि इच्छित फळाची प्राप्ती होते, असं म्हणतात.